बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने अनेक वर्षांपासून एकमेकांचे प्रतिस्पर्धी असणारे जिल्ह्यातील वरिष्ठ नेते दोन दिवसांपूर्वी एकमेकांसमोर आल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्याच पद्धतीने आज शनिवारी जिल्हा पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे उभयता एकमेकांशी दिलखुलास गप्पा मारताना दिसून आले.
शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी जिल्ह्यातील एकमेकांचे प्रतिस्पर्धी असणारे वरिष्ठ नेते एकाच व्यासपीठावर आले होते. जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे त्यावेळी गैरहजर होते. मात्र आज डीसीसी बँक निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री जारकीहोळी आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी हे उभयता बँकेमध्ये एकमेकांसमोर बसून दिलखुलास गप्पा मारताना दिसून आले. गेल्या तीन वर्षापासून लक्ष्मण सवदी व रमेश जारकीहोळी कधीही आमने-सामने भेटले नव्हते. मात्र डीसीसी बँक निवडणुकीच्या निमित्ताने आज ते शक्य झाले. या उभयतांनी समोरासमोर बसून अनेक विषयावर गप्पा मारल्या.
बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 16 जागांपैकी 12 जागा बिनविरोध झाल्या आहेत. आता उर्वरित चार जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज दुपारी 2 वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. त्यानिमित्ताने पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकमेकांना भेटले आणि त्यांच्या गप्पा रंगल्या.
विशेष म्हणजे जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातून विद्यमान आमदार अंजली निंबाळकर यांच्याविरोधात माजी आमदार व बँकेचे विद्यमान सदस्य अरविंद पाटील उभे ठाकले आहेत. या उभय तात समझोता घडवून आणून ही जागा देखील बिनविरोध करण्याच्या दृष्टीने जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यात चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.