बेळगावमधील फोर्ट रोडजवळील जुन्या भाजी मार्केटमध्ये गांजा सह अनेक अवैध प्रकारांना ऊत आला आहे.
या प्रकारांवर वेळीच रोख लावण्यासाठी आमदार अनिल बेनके यांनी छावणी परिषदेच्या अध्यक्षांना आग्रह केला. मंगळवारी छावणी परिषदेची सर्वसामान्य सभा बोलाविण्यात आली होती. छावणी परिषदेचे अध्यक्ष आणि ब्रिगेडियर रोहित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
त्यानंतर आमदार अनिल बेनके म्हणाले की गोगटे सर्कल येथील खुल्या जागेत विकास कामांना सुरुवात करण्यासाठी मुभा देण्यात यावी. त्याचप्रमाणे छावणी परिषदेच्या व्याप्तीत येणारे जुने भाजी मार्केट हे सध्या बंद आहे. त्यामुळे या परिसरात मटका, गांजासह इतर अवैध प्रकारांना ऊत आला आहे. यामुळे अशा प्रकारांवर त्वरित उपाययोजना करून हे प्रकार रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा.
तसेच आर. एल. लाईन जवळ असलेल्या देवस्थानात नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पूजा करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी छावणी परिषदेच्या नव्या कचरा संकलन करणाऱ्या वाहनाचे आमदार अनिल बेनके आणि छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रि. रोहित चौधरी यांनी चालना देऊन उदघाटन केले. यावेळी छावणी परिषदेच्या उपाध्यक्ष निरंजना अष्टेकर, सीईओ बर्चेस्वा, सदस्य अल्लाउद्दीन खिल्लेदार, साजिद शेख, डॉ. मदन डोंगरे, विक्रम पुरोहित, अरेबिया धरवाडकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
उत्तर आमदार अनिल बेनके यांनी मागणी केल्या मुळे जुन्या भाजी मार्केट मध्ये अवैध धंद्यांना ऊत आला असेल तर मार्केट पोलिसांनी देखील याकडे लक्ष देण्याची गरज आहे .