ऑटोनगर औद्योगिक वसाहतीत रस्ते, गटारी आदी मूलभूत नागरी सोईसुविधा पुरविण्यासंदर्भात आयोजित बैठक आज मंगळवारी पार पडली.
सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी बेळगांव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके हे होते. सदर बैठकीत ऑटोनगर औद्योगिक वसाहतीमध्ये रस्ते खुल्या गटारी, भुयारी गटारी (युजीडी) आदी विकास कामे राबवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे भारत हा आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. तेंव्हा त्या अनुषंगाने ऑटोनगर औद्योगिक वसाहतीतील उत्पादन कशारीतीने वाढवता येईल? याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना आमदार ॲड. अनिल बेनके यांनी ऑटोनगर औद्योगिक वसाहतीत लवकरात लवकर आवश्यक त्या सर्व मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाही दिली. तसेच आपापल्या क्षेत्रातील उत्पादन वाढवण्याबाबत उपस्थित उद्योजकांना आवाहनही केले.
याप्रसंगी सरकारच्या अल्पसंख्यांक विकास मंडळाचे अध्यक्ष मुक्तीयार पठाण, ऑटोनगर औद्योगिक विभाग संघटनेचे अध्यक्ष सुरेश यादव, सेक्रेटरी अशोक दानवडे यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी, सदस्य आणि उद्योजक उपस्थित होते.