डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करून संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटल वर हल्ला करून सामानाची तोडफोड केल्याची घटना खानापूरमध्ये आज मंगळवारी घडली.
खानापूर तालुक्यातील मोदेकोप्प गावातील सुरज शंकर गावडे या तरुणाचा मृत्यू डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे झाला असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. याबाबतची माहिती अशी की, सुरज गावडे या तरुणाला सोमवारी वर्दे कॉलनी खानापूर येथील डॉ रायन्नावर यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते
आज सकाळी त्याला डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सुरजचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी हॉस्पिटलमधून काढता पाय घेतला सदर घटनेची माहिती मिळतात मोदेकोप्प गावातील मयत सुरजच्या नातलगांच्या गावकऱ्यांनी वर्दे कॉलनी खानापूर येथील डॉ रायन्नावर यांच्या हॉस्पिटलकडे आपला मोर्चा वळविला.
या संतप्त जमावाने हॉस्पिटलमध्ये घुसून तेथील सामानाची तोडफोड केली. तसेच डॉक्टरांनी त्यांच्यासमोर हजर व्हावे, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे डॉक्टर येईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा कुटुंबियांनी घेतल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली. हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आल्यामुळे काही काळ वातावरण तंग बनले होते.