सध्या एकीकडे कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे होम काॅरंटाईनसाठी जारी करण्यात आलेल्या नियमावलीच्या उल्लंघनात देखील वाढ झाली असून या बाबतीत बेळगांव जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना होम काॅरंटाईनसाठी जारी नियमावलीच्या उल्लंघनात वाढ झाली आहे. राज्यात सुमारे 3000 जणांनी या नियमावलीचे उल्लंघन केले असून यामध्ये बेळगांव जिल्ह्यातील 134 जणांचा समावेश आहे. होम काॅरंटाईनमध्ये किमान 14 दिवस घरातच थांबणे जरुरीचे असते. या दरम्यान घरीच वैद्यकीय उपचार घेण्याची गरज असून नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर पडल्यास गुन्हा नोंदविला जातो. राज्यात होम काॅरंटाईन नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत 2,916 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
राज्यात होम काॅरंटाईन संदर्भातील नियम मोडण्याचे सर्वाधिक प्रकार राजधानी बेंगलोरमध्ये घडले आहेत. याठिकाणी 730 जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. त्याखालोखाल बेंगलोर ग्रामीणमध्ये 153 तर उडपी जिल्ह्यात 149 जणांविरुद्ध होम काॅरंटाईनचे नियम मोडल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उडपीनंतर बेळगांव जिल्ह्याचा क्रमांक असून याठिकाणी 134 जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
होम काॅरंटाईनसाठी आधी 14 दिवस काॅरंटाईन सक्तीचे होते. मात्र आता त्यात बदल झाला असून केवळ परदेशातून येणाऱ्या व्यक्तींना 7 दिवस होम काॅरंटाईन सक्तीचे करण्यात आले आहे. होम काॅरंटाईन झालेल्या व्यक्तींनी घराबाहेर पडू नये. त्यांनी अँड्रॉइड मोबाईलच वापरणे जरुरीचे आहे. अनेक संस्थांकडून अशा व्यक्तींवर नजर ठेवली जाते संबंधित व्यक्ती निर्धारित क्षेत्राबाहेर गेल्यास त्वरित संपर्क साधून कळविण्यात येते. काॅरंटाईन नियमांचे पालन न केल्यास थेट गुन्हा नोंदविला जाऊ शकतो.