परिवहन विभागाच्या वतीने दिवसेंदिवस वाहतूक आणि रहदारीच्या नियमात बदल करण्यात येत आहेत. हे बदल जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आले असले तरी यामध्ये सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. शिवाय पुन्हा हेल्मेटसक्ती अनिवार्य करण्यात आली असून या हेल्मेटसक्तीसंदर्भात भ्रष्टाचार निर्मूलन परिवाराच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
राज्यात कुठेही संचार करताना दुचाकीस्वारासह आता मागे बसलेल्यांनाही हेल्मेट घालणे अनिवार्य असल्याची सूचना नुकतीच परिवहन विभागाने दिली असून यासाठी दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही परिवहन खात्याने दिला आहे. या कारवाईत गरीब आणि मध्यमवर्गीय जनता भरडली जाईल, शिवाय आर्थिक भुर्दंड परवडणारा नाही. त्यामुळे या हेल्मेटसक्तीच्या कारवाई ऐवजी हेल्मेटसक्तीचे महत्व जनतेला पटवून देण्यासाठी जनजागृती करण्यात यावी, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन परिवाराच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बेळगावची लोकसंख्या ८ लाखांहून अधिक आहे. दुचाकीवरून प्रवास करताना मागील बाजूला बसलेल्या नागरिकही हेल्मेट घालणे त्रासदायक आहे. शिवाय ग्रामीण भागातील जनता, मध्यमवर्गीय जनताच दुचाकींचा वापर अधिक करते. कोरोना काळात आधीच आर्थिक त्रासात असलेल्या जनतेला दंडात्मक कारवाईचा खर्च परवडणारा नाही.
हेल्मेटसक्तीचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येतो. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिकांना हा दंड भरणे शक्य नाही. परिवहन खात्याच्या या निर्णयाचे स्वागत आहे. परंतु दंडात्मक कारवाईऐवजी जनजागृती केल्यास, हेल्मेटसक्तीचा उद्देश सफल होईल, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.
यावेळी सुजित मुळगुंद, नितीन बोलबंदी, सागर चौगुले, प्रवीण दोरडी आदी उपस्थित होते.