येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ आज पार पडला. यावेळी ज्येष्ठ राज्यपाल वजुभाई रुडाभाई वाला यांच्याहस्ते रँक विजेत्यांना सुवर्ण पदके, ७९ जणांना पीएचडी आणि मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. सोमवारी सुवर्णसौध येथे राणी चन्नम्मा विद्यापीठाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात हा पदवीदानाचा कार्यक्रम पार पडला. कोविड पार्श्वभूमीवर केवळ १०० जणांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. आम. रामचंद्रगौड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकात ते म्हणाले कि, राणी चन्नम्मा विद्यापीठाने दशकपूर्ती करून ११ व्य वर्षात पदार्पण केले आहे. भूतरामहट्टी येथील विद्यापीठ हिरेबागेवाडी येथे स्थलांतरित होणार असून यासाठी सरकारने १२७ एकर जागा मंजूर केली आहे.
मात्र भूतरामहट्टी आणि हिरेबागेवाडी येथे दोन्ही ठिकाणी विद्यापीठाची मुख्यालये असणार आहेत. हिरेबागेवाडी येथील विस्तृत जागेत विद्यापीठाचा आणि अभ्यासक्रमांचा विस्तार होईल. आणि भविष्यात विद्यापीठाचा विकास होईल, असे ते म्हणाले. यानंतर कुलसचिव प्रा. बसवराज पद्मशाली यांनी उपस्थित पाहुण्यांची ओळख करून दिली. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव प्रा. एस. एम. हुरकडली हे होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ‘नॅक’ चे संचालक प्रो. एस. पी. शर्मा यांनी ऑनलाईन प्रणालीनुसार उपस्थितांना मार्गदर्शन केले. राष्ट्रनिर्मितीत आजचे पदवी प्राप्त मान्यवर मोठी भूमिका बजावतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. नवीन पदवीधर हे देशाच्या प्रगतीच्या चाकांसारखे असून भविष्यात देशाला या पदवीधरांच्या स्वरूपात एक उत्तम नेतृत्व मिळेल, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले कि, चाणक्य नीतीप्रमाणे ज्ञान हे मातृस्थानावर आहे. आणि पवित्र आहे. अनेक काळापासून शिक्षणाला महत्व आहे. राणी चन्नम्मा आणि अक्कमहादेवींच्या तत्वांचा संदर्भ देत त्यांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले. आज जगात स्पर्धा वाढली असून या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. त्यामुळे असे अनेक पदवीधर घडायला हवेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
क्रीडा व समाज क्षेत्रातील कार्याबद्दल गोविंदराज यांना, तर औद्योगिक क्षेत्रासाठी पदमश्री मोहनदास पै आणि शिक्षण आणि समाज सेवा कार्यासाठी जगद्गुरू निरंजन स्वामी उन्न मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ राज्यपाल वजुभाई रुडाभाई वाला यांच्याहस्ते हि पदवी प्रदान करण्यात आली. या पदवीदान समारंभात एकूण ३३ हजार ९७४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. ७९ पीएचडी धारक, तसेच ११ विविध विभागांच्या ११ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. याव्यतिरिक्त स्नातक आणि स्नातकोत्तर विभागातील २२ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके देण्यात आली.
या समारंभाला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त के. त्यागराजन, कर्नाटक माहिती आयोगाच्या आयुक्त गीता बी. व्ही. जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., तसेच विश्वविद्यालयाची कार्यकारी समिती, शिक्षण परिषदेचे सदस्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.