बेळगांव रोलर स्केटिंग अकॅडमी आणि प्रेरणा पी. यु. कॉलेज, बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने “फिट इंडिया -स्ट्रॉंग इंडिया” या शीर्षकाखाली उद्या शनिवार दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता बेळगांव ते जांबोटी आणि जांबोटी ते बेळगांव अशा भव्य स्केटिंग, सायकलिंग आणि रनिंग (धावणे) रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
“फिट इंडिया -स्ट्रॉंग इंडिया”च्या या भव्य रॅलीमध्ये 12 वर्षापासून 60 वर्षे वयोगटातील 45 जणांचा सहभाग असणार आहे. रॅलीचे उद्घाटन उद्या सकाळी 7 वाजता गोवावेस स्विमिंग पूल येथे प्रमुख पाहुणे गौरव कुमार यांच्या हस्ते होणार आहे. बेळगांव ते जांबोटी पर्यंतच्या या रॅलीचा परतीचा मार्ग जांबोटी, किणये, मच्छे, पिरनवाडी, उद्यमबाग, तिसरे रेल्वे गेट, दुसरे रेल्वे गेट, आरपीडी कॉर्नर मार्गे प्रेरणा पी. यु. कॉलेज बेळगांव असा असेल.
स्केटिंग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या रॅलीची दुपारी 1:30 वाजता सांगता होईल. सदर रॅलीच्या स्केटिंग प्रकारात 14 स्केटर्स, सायकलिंग प्रकारात 15 सायकलपटू आणि रनिंग अर्थात धावणे प्रकारात 11 धावपटूंचा सहभाग असणार आहे. रॅली दरम्यान या सर्वांसाठी 7 डॉक्टरांचे वैद्यकीय पथक तैनात असणार आहे, अशी माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे.