बेळगावमध्ये फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या वतीने नेहमीच अडलेल्या आणि गरजू नागरिकांना मदत केली जाते. कोणत्याही ठिकाणी कोणत्याही स्वरूपाच्या मदतीसाठी हाक दिल्यास फेसबुक फ्रेंड्स सर्कल तात्काळ मदतीसाठी धावतं. आज कपिलेश्वर ओव्हर ब्रिजजवळील भांदूर गल्लीतील एका ज्येष्ठ नागरिकासाठी अशाच पद्धतीने फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्यावतीने मदत करण्यात आली आहे.
या ज्येष्ठ नागरिकाच्या घरी त्यांच्या मुलीव्यतिरिक्त कुणीही धावपळ करणारे नाही. त्यांना ऑक्सिजन सिलिंडरची अत्यंत गरज होती. यासाठी त्यांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या संतोष दरेकर यांना फोन लावला.
तातडीने दरेकर यांनी विशालनंद पेडणेकर यांना या प्रकाराची माहिती दिली. आणि अवघ्या २० मिनिटाच्या अवधीतच विशालनंद हे भांदूर गल्ली येथे ऑक्सिजन सिलिंडरसहित दाखल झाले. फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या माध्यमातून विशालनंद यांनी केलेल्या मदतीबद्दल ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या मुलीने आभार व्यक्त केले.
फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या वतीने अशा पद्धतीच्या मदतीसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, हे विशेष. या ज्येष्ठ नागरिकाला ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी विनायक लोकूर, संतोष ममदापुर, वेंकटेश पाटील यांचे सहकार्य लाभले. शहर आणि परिसरात गरजूंना मदत करणाऱ्या संस्थांपैकी फेसबुक फ्रेंड्स सर्कल ही संस्था कार्यरत असून गेल्या अनेक महिन्यांपासून या संस्थेच्यावतीने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.