कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतुहे शिक्षण घेत असताना अनेक विद्यार्थ्यांना समस्या निर्माण होत असून यामुळे पालकही चिंतेत आहेत. यासंदर्भातील विविध मागण्यांसाठी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक यांना निवेदन सादर केले.
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक पालकांच्या उत्पन्नाचा स्रोत कमी झाला आहे. अनेक पालकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर अनेक पालक अर्ध्या पगारावर काम करत आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा अतिरिक्त भार पालकांना उचलावा लागत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सरकारने ऑनलाईन शिक्षणाचा अवलंब केला. परंतु यासाठी स्मार्टफोनच्या आधारे हा अभ्यासक्रम घेतला जात आहे.
आधीच कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटलेल्या पालकांना स्मार्ट फोनचा अतिरिक्त खर्च सोसावा लागला. कित्येक पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने अनेक पालकांनी इतर गोष्टीची तडजोड करून स्मार्ट फोन घेतले.
परंतु अनेक कुटुंबामध्ये २ हुन अधिक विद्यार्थी आहेत. शाळा आणि अभ्यासक्रम घेण्याचे वेळापत्रक हे सर्वांचे समान असल्याने एकाच स्मार्ट फोन वर अभ्यासक्रम घेणे शक्य नाही. त्यातच लॉकडाऊन ५.० मार्गसूची जाहीर झाली असून अनेक पालकांना आपल्या कामावरही जावे लागत आहे. याकाळात विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन मिळणे अवघड होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यातच आजकालचे विद्यार्थी अतिशय मोबाईलशी जोडले गेल्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष भरकटण्याचेही प्रकार होत आहेत.
या सर्व बाबी या निवेदनात नमूद करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने शाळेमार्फतच प्रत्येक विद्यार्थ्याला स्मार्ट फोन देण्याची सोय करावी, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचू शकेल. आणि पालकांवर होत असलेला अतिरिक्त भरदेखील कमी होईल. विद्यार्थ्याला स्मार्ट फोन मिळेल अशी योजना सरकारने आखावी, अशी सूचना या निवेदनात करण्यात आली आहे.
आज अनेक ठिकाणी पालकांची या स्मार्ट फोनवरील अभ्यासक्रमामुळे प्रचंड ओढाताण होत आहे. विस्कटलेल्या आर्थिक घडीमुळे नवा स्मार्ट फोन घेऊन देणे हे प्रत्येकाला शक्य नाही. परंतु ज्या शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण देण्याची संकल्पना राबविली आहे, त्याच संकल्पनेचा पुढील भाग म्हणून शिक्षण विभागाने शाळेमार्फत स्मार्ट फोन देण्याची सोय करावी. ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचणे सोपे होईल.