मातृत्वासोबत कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी समाजातील नवदुर्गा ‘बेळगाव लाईव्ह’ च्या माध्यमातून प्रकाशझोतात आणत आहोत. नवदुर्गा.. ज्यांनी स्त्री-पुरुष या भेदापलीकडे जाऊन पुरुषाच्या बरोबरीने अनेक क्षेत्रात पुढाकार घेतला आहे.. अशा नवदुर्गांची कहाणी आपण पहात आहोत. आज नवरात्रीची पाचवी माळ.. यानिमित्ताने बेळगावमधील नामांकित राणी चन्नम्मा विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख म्हणून पदभार सांभाळणाऱ्या प्रा. मनिषा नेसरकर यांच्याशी केलेली बातचीत…
स्त्रीशिक्षणाचं महत्त्व जोतिबा फुलेंनी दीडशे वर्षांपूर्वी ओळखलं होतं. १८४८ मध्ये पहिली मुलींची शाळा ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरु केली. त्यानंतर भारतरत्न महर्षी कर्वे यांनी १९१६ साली केवळ महिलांसाठी विद्यापीठ स्थापन केले आणि महिलांना उच्चशिक्षणाची दारे उघडून दिली. महर्षी कर्वे यांच्या सारख्या दूरदृष्टीच्या समाजसुधारकाने महिलांना समाजात पुरूषांच्या बरोबरीने स्थान मिळावे यासाठी आयुष्यभर काम केले. भारतातील स्त्री शिक्षणाच्या महत्त्वामुळे हजारो स्त्रियांच्या आयुष्याला आकार आला. याच धर्तीवर अनेक स्त्रिया शिक्षणासहित मोठ्या हुद्द्यावर काम करू लागल्या. शिक्षण घेण्यापासून ते विद्यादानापर्यंत मजल मारलेल्या महिला शिक्षकांची संख्या बघता बघता वाढू लागली. बेळगाव जिल्ह्यातील विद्यादानाचे कार्य पार पाडणाऱ्या आणि नामांकित राणी चन्नम्मा विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख म्हणून पदभार सांभाळणाऱ्या प्रा. मनीषा नेसरकर या शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत आहेत.
एम.ए., पीएचडी पर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रा. मनिषा नेसरकर या राणी चन्नम्मा विद्यापीठात मराठी अध्ययन व संशोधन विभागात विभागप्रमुख तसेच विद्यापीठाच्या स्कुल ऑफ लँग्वेजीस च्या अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे गेली पाच वर्षे विद्यापीठाच्या महिला सबलीकरण केंद्राच्या निर्देशिका म्हणून विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी तसेच बंबरगा या विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या गावात विविध उपक्रम राबविले आहेत. शिवाय विद्यापीठच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या निर्देशिका म्हणून काम पहात आहेत. याव्यतिरिक्त विद्यापीठाच्या विविध समित्यांवरही त्या कार्यरत आहेत. प्रा. मनिषा नेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सहा विद्यार्थी पीएचडी करत आहेत.
मराठी भाषा व संवर्धनाच्या दृष्टीने तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विभागात कार्यशाळा, चर्चासत्र, व्याख्याने, अभ्यास सहली, आदींचे आयोजन त्यांनी केले आहे. सीमाभागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांद्वारे करियर करण्यासाठी राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या अंतर्गत अनेक उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थी सेट, नेट परीक्षा उत्तमरित्या उत्तीर्ण झाले आहेत. तर अजूनही काही विद्यार्थी या परीक्षांसाठी तयारी करत आहेत. राणी चन्नम्मा विद्यापीठात कार्यभार सांभाळणाऱ्या प्रा. मनिषा नेसरकर या गेली २० वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. राणी पार्वतीदेवी महाविद्यालय, भाऊराव काकतकर महाविद्यालयातून त्यांनी सेवा बजावली आहे. विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या उत्तम सहकार्यामुळे विद्यापीठातील जबाबदारी पार पाडणे आनंददायी वाटते, असे मत त्यांनी ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना व्यक्त केले.
आजच्या काळातील स्त्री शिक्षणाचे महत्व पटवून देताना त्या म्हणाल्या कि, सध्याची एकंदर परिस्थिती पाहता स्त्रियांनी सर्वतोपरी सक्षम होणे गरजेचे आहे. पण अजूनही म्हणावी तितकी जागरूकता स्त्रियांमध्ये आलेली नाही. महाराष्ट्राच्या तुलनेत बेळगाव परिसरातील बहुजन समाजातील स्त्रिया वैचारिक दृष्ट्या खूप मागासलेल्या दिसतात. आजही त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबनाचा विचार करत नाहीत. एम. ए. ऍडमिशनच्यावेळी याची तीव्रतेने प्रचिती येते, असे त्या सांगतात. आजच्या काळात एकीकडे स्त्रिया अंतराळात प्रवास करत आहेत, परदेशात एकट्या जाऊन शिकत आहेत. या भागातील मुलींना आणि त्यांच्या कुटुंबियांना आपल्या भागात असलेल्या विद्यापीठात शिक्षणासाठी पाठविणे गरजेचे वाटत नाही, याची खंत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
पालक तसेच मुलींमध्ये शिक्षणविषयक जागृती, सकारात्मक दृष्टिकोन बिंबवणे गरजेचे आहे. जोपर्यंत स्त्री शिकत नाही, तोपर्यंत कुटुंबावर चांगले संस्कार होत नाहीत, आणि त्याचे समाजावरही दूरगामी परिणाम होतात, याची प्रचिती आपल्याला येतेच आहे. आजकाल स्त्रियांवर जे अत्याचार होत आहेत, त्यावर मला ‘स्त्री शिक्षण’ हाच उपाय योग्य वाटतो. शिकलेली स्त्री स्वावलंबी, धाडसी बनली तर ती सहजासहजी अत्याचाराला बळी पडणार नाही. शिवाय शिक्षणाने तिच्यात जी सुसंस्कृतता येईल, त्यामुळे, तिच्यावर कोणीही अत्याचार करायला धजणार नाही. म्हणून चूल आणि मूल या चाकोरीत न अडकता त्याबरोबरच उच्च शिक्षणही घेतले पाहिजे व आरोग्यदायी समाजाच्या पर्यायाने देशाच्या जडणघडणीत मोलाचे सहकार्य केले पाहिजे. कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड, भीती मनातून हद्दपार करून नव्या जगाला नव्या उमेदीने, जिद्दीने, धाडसाने सामोरे गेले पाहिजे. स्वतःला सिद्ध केले पाहिजे व जगण्याचा, स्वातंत्र्याचा आनंद लुटला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महिलांचे समाजातील स्थान अधोरेखित करताना त्यांनी महिलांचे शिक्षण केवळ कुटुंबाच्या नव्हे तर देशाच्या प्रगतीला मोठा हातभार लावणारे ठरते, असे सांगून स्त्रीला निसर्गाकडून आपल्या मुलांना आणि कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्यासाठीची एक शक्ती मिळाली आहे. स्त्रियांनी उच्च-शिक्षण घेण्यासाठी पुढे यावे, कुटुंबाने याकडे लक्ष पुरवावे, केवळ पदवी/ पदव्युत्तर पदवी घेण्यावरच भर न देता त्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि पर्यायाने समाजाच्या विकासासाठी, उत्कर्षासाठी करावा हेच आजच्या युगातील सुखद स्वप्न ठरेल असे त्या म्हणाल्या.
शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावून विद्यादानाचे कार्य उत्तमरीत्या पार पाडणाऱ्या प्रा. मनीषा नेसरकर यांना ‘बेळगाव लाईव्ह’ कडून सलाम आणि पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!
-वसुधा कानूरकर सांबरेकर