शहापूर नाथ पै सर्कलपासून वडगांवच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या सुमारे दीडशे मीटर भागाची पार दुर्दशा झाली आहे. परिणामी नागरिकांची गैरसोय होऊन अपघाताचा धोका वाढला असल्यामुळे या ठिकाणचे रस्त्याचे विकास काम तात्काळ हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
नाथ पै सर्कल ते वडगांवच्या दिशेने येळ्ळूर क्रॉस बसस्टॉपपर्यंतच्या सुमारे 1.5 कि. मी. अंतराच्या रस्त्याचे 7 वर्षापूर्वी रुंदीकरण झाले आहे. आता स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत येळ्ळूर क्रॉस बस स्टॉपपासून शहापूर पोलीस स्थानकापर्यंतच्या या रस्त्याचे व्हाइट टॉपिंग घालून नूतनीकरण करण्यात आलेले आहे. मात्र पोलीस स्थानकापासून नाथ पै सर्कलपर्यंतच्या रस्त्याचे रखडले आहे. सदर सुमारे सव्वाशे मीटर अंतराच्या रस्त्याची दुर्दशा झाली असून या रस्त्यावरील खड्डे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहेत.
गेल्या कांही दिवसात पडलेल्या पावसामुळे रस्त्यांची अवस्था अधिक दयनीय झाली आहे. या या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. परिणामी या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचार्यांना विशेष करून दुचाकी वाहन चालकांना मोठी कसरत करत जावे लागत आहे.
या रस्त्यावर वडगांवसह येळ्ळूर, धामणे आदी भागातील लोकांची सतत ये-जा सुरू असते. या सर्वांसाठी सदर रस्ता सध्या धोकादायक बनला आहे. तरी स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन नाथ पै सर्कलपासून वडगांवकडे जाणाऱ्या रस्त्याचे शिल्लक राहिलेले व्हाईट टॉपिंगचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.