कोरोना प्रादुर्भावामुळे सरकारी अटी नियमांचे पालन करून यंदाचा विजयादशमी अर्थात दसरा सणादिवशी पालखी मिरवणूक आणि ज्योती कॉलेज मैदानावरील सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पारंपारिकरित्या परंतु साध्या पद्धतीने पार पाडण्यात येईल, अशी माहिती शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आणि बेळगांवचे वतनदार रणजीत चव्हाण -पाटील यांनी दिली.
दरवर्षी दसरा अर्थात विजयादशमी दिवशी सायंकाळी शहरातील ज्योती कॉलेज मैदानावर भव्य प्रमाणात सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होत असतो. या कार्यक्रमात शहर आणि परिसरातील हजारो लोक सहभागी होत असतात. तथापि यंदा मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे या सीमोल्लंघनाचा कार्यक्रमावर कांही सरकारी निर्बंध पडले आहेत. चव्हाट गल्ली येथून ज्योती कॉलेज मैदानावरील सीमोल्लंघनाचा ठिकाणी निघणाऱ्या पारंपारिक पालखी मिरवणुकीसह सीमोल्लंघनाच्या जाहीर कार्यक्रमास अद्याप रीतसर परवानगी मिळालेली नसली तरी कोरोना संदर्भातील सरकारच्या अटी नियमांचे पालन करून कोणत्याही परिस्थितीत पालखी आणि सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पाडला जाईल.
चव्हाट गल्ली येथील देवदादा सासन काठी आणि नंदीची मिरवणूक साधेपणाने काढण्यात येईल. तसेच ज्योती कॉलेज मैदानावरील तलवार पूजा, नंदी पूजा, बन्नी मोडणे आदी सर्व विधी पारंपारिक पद्धतीने पार पडतील, असे रणजीत चव्हाण -पाटील यांनी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे या कार्यक्रमाप्रसंगी ज्योती कॉलेज मैदानावर मानकरी पाटील घराण्याचे सदस्य तसेच श्री देवदादा सासनकाठी अर्थात चव्हाट गल्ली श्री ज्योतिर्लिंग देवस्थान कमिटी आणि बेळगांव शहर देवस्थान कमिटीचे सदस्य हेच फक्त उपस्थित असतील. तेंव्हा सरकारी निर्बंध असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे नागरिकांनी यावेळी ज्योती मैदानावर गर्दी न करता आपापल्या घरात पारंपारिक पद्धतीने सण साजरा करावा, असे आवाहनही चव्हाण -पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, काल रविवारी शासकीय विश्रामधाम येथे हे शहर व चव्हाट गल्ली देवस्थान कमिटीच्या सदस्यांनी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची भेट घेऊन शहरातील पारंपारिक पालखी मिरवणूक आणि सीमोल्लंघन कार्यक्रमास परवानगी मिळवून द्यावी, अशी मागणी केली. तेंव्हा कमीतकमी लोकांच्या उपस्थितीत नियम न मोडता पारंपारिक पालखी मिरवणूक आणि सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होणार असेल तर आपण निश्चितपणे परवानगी मिळवून देऊ असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे अशी माहितीही रणजीत चव्हाण -पाटील यांनी दिली.
विजयादशमी दिवशी निवडक मोजक्या 20 -25 मंडळींच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक आणि सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होईल, अशी माहिती चव्हाट गल्ली देवस्थान कमिटीचे सदस्य सुनील जाधव यांनी दिली. श्री देवदादा सासन काठीची पालखी मिरवणूक चव्हाट गल्ली येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरापासून प्रारंभ होणार असून मारुती मंदिर, शेट्टी गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, बसवान गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, ध. संभाजी चौक व यंदेखूट मार्गे मिरवणुकीची ज्योती कॉलेज मैदानावर सांगता होईल. यंदा श्री दुर्गामाता दौडमध्ये ज्याप्रमाणे मोजकेच धारकरी धावत आहेत, त्याप्रमाणेच पालखी मिरवणुकीत देखील कांही मोजक्याच मंडळींचा सहभाग असणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करून काढण्यात येणारी ही पालखी मिरवणूक मार्गावर कोठेही न थांबता थेट ज्योती कॉलेज मैदानावर समाप्त होईल. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावेळी नागरिकांनी पालखीला पुष्पहार घालणे, आरती करणे, श्रीफळ वाढवून पूजन करणे आदी गोष्टी कृपया करू नयेत. त्याच प्रमाणे सीमोल्लंघनाच्या कार्यक्रमासाठी नागरिकांनी ज्योती मैदानावर देखील जाऊ नये. त्याऐवजी प्रत्येकाने आपापल्या घरात पारंपारिक पद्धतीने सण साजरा करावा असे आवाहन श्री देव दादा सासनकाठी देवस्थान कमिटी चव्हाट गल्ली आणि बेळगाव शहर देवस्थान कमिटीच्यावतीने रणजीत चव्हाण -पाटील, रमाकांत कोंडुसकर, लक्ष्मण किल्लेकर, सुनील जाधव, नागेश नाईक, परशुराम माळी, विजय तमुचे व अभिजीत आपटेकर यांनी केले आहे.