हुक्केरी येथील श्री गुरुशांतेश्वर संस्थान हिरेमठामधील दसरा उत्सवाचा उद्घाटन समारंभ नुकताच एका मुस्लीम नेत्याच्या हस्ते पार पडला. या मठाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे की एका बिगर हिंदू व्यक्तीला या मठातील दसरा उत्सवाचे उद्घाटन करण्याचा मान देण्यात आला.
मठाधीश पु. श्री चंद्रशेखर महास्वामी यांच्या निमंत्रणावरुन कर्नाटक अल्पसंख्याक विकास निगमचे चेअरमन मुक्तार पठाण यांनी नुकतेच श्री गुरुशांतेश्वर संस्थान हिरेमठातील दसरा उत्सवाचे उद्घाटन केले. उद्घाटक म्हणून मान मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पठाण यांनी मठाच्या समस्त हिंदू-मुस्लीम अनुयायानी कोरोनाच्या निर्मूलनासाठी प्रार्थना करावी असे आवाहन आपल्या भाषणात केले.
उत्तर कर्नाटकातील काही अन्य संस्थांप्रमाणे श्री गुरु शांतेश्वर संस्थान हिरेमठ गेल्या अनेक दशकापासून जातीय सलोख्याला पाठिंबा देत आला आहे. कोणत्याही जातीधर्माला थारा न देता या मठामध्ये सर्वाना मुक्त प्रवेश दिला जातो. परिणामी दरवर्षी शेकडो मुस्लिम बांधव या मठाला भेट देत असतात. अनेक राजकीय नेते मंत्री आणि माजी आयपीएस अधिकारी शंकर बिदरी हे या मठाच्या हजारो अनुयायांपैकी हे एक आहेत.
श्री गुरुशांतेश्वर संस्थान हिरेमठाप्रमाणे गदग जिल्ह्यातील मुरुगराजेंद्र कोरणेश्वर शांतीधाम मठ हा देखील जातीय सलोख्याला पाठिंबा देणारा मठ म्हणून ओळखला जातो.
22 व्या शतकातील संत श्री बसवन्ना यांच्या शिकवणीने प्रभावित झालेल्या 33 वर्षीय दीवान शरीफ रहमानसाब मुल्ला यांनी गेल्या फेब्रुवारी महिन्यात असुती या गावातील मुरुगराजेंद्र कोरणेश्वर शांतीधाम मठाचे मठाधीश म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत, हे विशेष होय.