कोरोना प्रादुर्भावाचे संकट लक्षात घेऊन यंदाची श्री दुर्गामाता दौड अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेने घेतला आहे. या दौडमध्ये ध्वजधारी आणि पाच शस्त्रधारी अशा मोजक्या लोकांच्या सहभागात ही दौड आयोजित करण्यात आली आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी ही माहिती दिली. बुधवारी झालेल्या बैठकीत समस्त शिवप्रेमी व धारकऱ्याच्या संमतीने उपरोक्त निर्णय घेण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली.
किरण गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सालाबादप्रमाणे येत्या 17 ते 25 ऑक्टोबर दरम्यान श्री दुर्गामाता दौडीच्या आयोजनासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र या प्रयत्नांना यश मिळू शकले नाही. देशभरात कोरोनाविषाणूने हाहाकार माजविला आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सर्व सण आणि उत्सवांवर बंदी घातली आहे.
तथापि श्री दुर्गामाता दौडची परंपरा खंडित होऊ नये, ही परंपरा जपता यावी म्हणून औपचारिक दौड काढली जाईल. यासाठी आरती होऊन दौडला जेथून प्रारंभ होतो तेथून शेवटी ज्या मंदिराच्या ठिकाणी दौड समाप्त होते त्या मार्गावर यंदा मोजक्याच जणांची उपस्थिती असणार आहे, शिवाय या दौडमध्ये इतर कोणालाही सहभागी होता येणार नाही, असे त्यांनी कळवले आहे.
समस्त शिवप्रेमी व धारकऱ्यानी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या झालेल्या बैठकीत यंदाच्या दौडमध्ये सहभागी होण्याऐवजी तुकाराम पिसे या धारकऱ्याने दिलेल्या सूचनेचे पालन करावे.
प्रतिष्ठानच्या सूचनेनुसार सर्वांनी सकाळी 5.30 वाजता दौडच्या ठिकाणी न जाता आपापल्या घरी कौटुंबिक पातळीवर अथवा आपल्या गल्लीमध्ये दसऱ्याचे नऊ दिवस श्री शिवचरित्राचे पारायण करावे, असेही किरण गावडे यांनी सांगितले. दरवर्षी श्री दुर्गामाता दौड यशस्वी करण्यासाठी ज्या पद्धतीने शिवप्रेमींसह समस्त बेळगांववासीय सहकार्य करतात तसेच सहकार्य यंदाही करावे, असे आवाहन किरण गावडे यांनी समस्त शिवप्रेमींना केले आहे.