प्रत्येकाला धास्ती लावलेल्या कोरोनाची दहशत सर्वत्र सुरु आहेच. परंतु त्याहूनही अधिक दहशत उपचार आणि रुग्णालय प्रशासनाच्या कारभाराची आहे. पॉझिटिव्ह रुग्ण कधी निगेटिव्ह होतात तर निगेटिव्ह रुग्ण हे पॉझिटिव्ह होतात. रुग्णालय प्रशासनाच्या या अनागोंदी कारभारामुळे नातेवाईक आणि रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे.
माजी आमदार कै. बी. आय. पाटील यांचे नुकतेच निधन झाले. शरीरात रक्त कमी झाल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते थेट कोविड वार्डात उपचार करण्यात आले होते.दरम्यान त्यांची कोविड तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी शासनातर्फे बी. आय. पाटील यांचे रिपोर्ट्स पुढे पाठविण्यात आले. आणि तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या अनुषंगाने बी. आय. पाटील यांच्यावर कोविड मार्गसूचीअंतर्गत अंत्यसंस्कार करण्यात आले.
परंतु त्यानंतर पुन्हा एकदा त्यांचे रिपोर्ट्स तपासले असता त्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. यासंदर्भातील नोटिफिकेशनही आले आहे. त्यामुळे खाजगी आणि प्रशासकीय रुग्णालयाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून घडल्या प्रकाराबाबत बी. आय. पाटील यांच्या कुटुंबीयांसहित जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
चारवेळा आमदारपदी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीबाबत अशाप्रकारे दुर्लक्ष झाले असेल तर मग सर्वसामान्य नागरिकांनी रुग्णालयावर कसा विश्वास ठेवावा? सर्वसामान्य नागरिक कोविड उपचारावर आधीच ताशेरे ओढत आहेत. परंतु आता अशा लोकप्रतिनिधींच्या बाबतीतही असे प्रकार घडत असतील तर मात्र नागरिकांनी रुग्णालयाकडून कोणती अपेक्षा ठेवावी? याआधीही सर्वसामान्य नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्या आहेत. परंतु आता लोकप्रतिनिधींच्या बाबतीतच दुर्लक्ष करण्यात येत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी. कोविड रिपोर्ट बाबतीत पुढे आलेल्या या प्रकारामुळे रुग्णालयावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.
माजी आमदार बी. आय. पाटील यांनी जनतेसाठी खूप काम केले होते. चार वेळा आमदारपदी निवडून आल्यानंतर मराठी जनतेला खंबीर नेतृत्व मिळाले होते. त्यामुळे बी. आय. पाटील यांच्याशी अनेक नागरिकांच्या भावना जोडल्या गेल्या होत्या. परंतु त्यांना रुग्णालयाने कोविड पॉझिटिव्ह घोषित केल्यामुळे त्यांच्यावर योग्यरितीने अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत.
शिवाय त्यांचे अंतिम दर्शन घेणेही प्रत्येकाला लाभले नाही. त्यानंतर आज त्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्यानंतर आणि हि बाब अनेकांच्या निदर्शनास आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभारावर नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.