कोरोनामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची आणि त्याच्या नातलगांची परवड होऊ नये यासाठी आता श्रीराम सेना हिंदुस्तानने देखील गेल्या महिनाभरापासून पुढाकार घेतला आहे. श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कोरोना योद्ध्यांनी या सत्कार्याला प्रारंभ केल्यामुळे सर्वसामान्य तसेच गरीब जनतेमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
कोरोनामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची आणि त्याच्या नातलगांची परवड होऊ नये यासाठी गेल्या महिनाभरापासून श्रीराम सेना हिंदुस्तान ही संघटना अहोरात्र झटत आहे. लेक व्यू हॉस्पिटलमध्ये काल रविवारी निधन पावलेल्या माजी आमदार बी. आय. पाटील यांच्या पार्थिवावर श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेच्या कार्यकर्त्यांनीच अंतिम संस्कार केले.
हे कार्य करण्यात श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली श्रीकांत कुऱ्याळकर, शंकर पाटील, सचिन पाटील, राजेंद्र बैलूर, बाबू नावगेकर, महेश जाधव, सचिन चव्हाण नवीन हंचिनमणी व सुरेश लाटे यांचा सक्रिय पुढाकार होता. सेनेच्या या कोरोना योद्ध्यांनी काल माजी आमदार पाटील यांच्या व्यतिरिक्त अन्य एका मृतदेहावर अंतिम संस्कार केले. सदाशिनगर स्मशानभूमीत हा अंत्यसंस्कार झाला.
कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या कांही महिन्यांपासून मृतांची संख्या वाढली आहे. परिणामी मृतांच्या नातेवाईकांसाठी हॉस्पिटलमधून मृतदेह घेऊन जाणे त्याच्यावर अंत्यसंस्कार करणे कठीण जात होते. याची गंभीर दखल घेऊन श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेने गेल्या महिनाभरापासून स्वतःच्या ऍम्ब्युलन्स आणि शववाहिकेच्या सहाय्याने मृतदेहांची ने -आण करणे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे हे कार्य विनामूल्य सुरू केले आहे.
श्रीराम सेना हिंदुस्तानच्या कोरोना योद्ध्यांनी अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली आतापर्यंत कोरोनामुळे मृत पावलेल्या शहर परिसरातील सुमारे 30 व्यक्तींवर अंतिम संस्कार केले आहेत. बेळगांव श्रीराम सेना हिंदुस्थानच्या या कार्यामुळे सर्वसामान्य तसेच गरीब जनतेला मोठा दिलासा मिळाला असून मृतांचे नातेवाईक दुवा देताना दिसत आहेत.