निधीचा दुरुपयोग होत असल्याच्या कारणावरून महापालिकेच्या राखीव अनुदानांतर्गत लॅपटॉप खरेदी करता 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याऐवजी लॅपटॉप खरेदी करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार यंदा बेळगांव महापालिकेकडून 32 लॅपटॉपचे वितरण केले जाणार आहे.
महापालिकेला मिळणाऱ्या अनुदानामधून गरजूंकरिता वैयक्तीक योजना राबविण्यासाठी निधी ठेवण्यात येतो. मागासवर्गीयांसाठी 25.3 टक्के अल्पसंख्यांकाकरिता 7.28 टक्के आणि अपंगांसाठी 5 टक्के अनुदान राखीव ठेवण्यात येते. राज्य किंवा केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानासह महापालिकेच्या उत्पन्नातील विविध राखीव ठेवीतून गरजूंकरता योजना राबविण्यात येतात.
स्वयंरोजगार, गॅस संपर्क योजना, ड्रेनेज वाहिनी व नळ जोडणी तसेच शैक्षणिक योजनेअंतर्गत गरजूंना लॅपटॉप आणि प्रशिक्षण यासाठी राखीव निधी खर्च करण्यात येतो. यंदा कोरोनामुळे राज्य शासनाकडून अद्याप कोणतेही अनुदान मंजूर झालेले नाही.
मात्र मनपाकडे राखीव असलेल्या अनुदानामधून स्वयंरोजगार व लॅपटॉप वितरण करण्यात येणार आहे. मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या अनुदानामधून 22 लॅपटॉप आणि अल्पसंख्यांक करता राखीव अनुदानामधून 10 लॅपटॉप वितरित करण्यात येणार आहेत.