कोरोना महामारीचे बेळगांवसह देशातूनच नव्हे तर जगातून उच्चाटन व्हावे आणि बेळगाववासियांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि बळ मिळून त्यांची भरभराट व्हावी यासाठी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या हस्ते बेळगावची ग्रामदेवता श्री मरगाई देवी महापूजा आणि माँ चंडिका होम मोठ्या भक्तिभावाने पार पडला.
भांदुर गल्ली येथील श्री मरगाई मंदिरामध्ये आज शुक्रवारी उपरोक्त देवीची महापूजा आणि माँ चंडिका होम या विधींचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे यजमानपद आमदार ॲड अनिल बेनके यांनी भूषविले. मंत्रघोषात महापूजा आणि माँ चंडिका होम झाल्यानंतर आमदार बेनके यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
सदर कार्यक्रमानंतर बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले की, गेल्या 7 -8 महिन्यांपासून बेळगांवातच नव्हे तर जगामध्ये कोरोनाविषाणू महामारीमुळे वेगवेगळ्या या प्रकारे अपरिमित हानी झाली आहे.
तेंव्हा या कोरोना पासून बेळगांवसह आपला देशच नव्हे तर जग सुरक्षित राहावे आणि पृथ्वीतलावरून कोरोनाविषाणू तडीपार व्हावा म्हणून आज या महापूजा आणि चंडिका होम कार्यक्रमाचे जे आयोजन करण्यात आले त्याबद्दल देवस्थान कमिटी आणि येथील जनतेचे धन्यवाद मानावे तितके कमीच आहेत.
माझ्या माहितीप्रमाणे कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी बेळगावात अशा पद्धतीने होम हवन आणि महापूजा पहिल्यांदाच होत आहे, असे आमदार बेनके यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कोरोना महामारीचे संकट खरोखर दूर करावयाचे असेल तर सर्वांनी सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी भांदूर गल्लीतील पंचमंडळींसह प्रतिष्ठित नागरिक आणि बहुसंख्य भाविक उपस्थित होते.