आज सकाळी काँग्रेसचे राज्याध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या निवासस्थानी टाकण्यात आलेला छापा हे भाजपचे षडयंत्र आहे, अशी टीका केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केली आहे. आज टाकण्यात आलेला छापा हा काही नवा नसून पूर्वनियोजित कट असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या छाप्यासंदर्भात त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून आपली प्रतिक्रिया दिली असून, येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला त्रास देण्यासाठी भाजपने हा कट रचला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केंद्रात भाजपाची सत्ता असून आपल्या अखत्यारीत असणाऱ्या संस्थांचा दुरुपयोग भाजप करत आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. यासंदर्भात आमच्यावर अनेक आरोप केले असून काँग्रेस हा पक्ष मोठा आहे, त्यामुळे अशा कारवायांना आम्ही घाबरत नाही, असेहि त्यांनी व्हिडिओद्वारे मत व्यक्त केले आहे.
डी. के. शिवकुमार हे अशा कारवाया निस्तरण्यासाठी समर्थ आहेत, अशा गोष्टींना तोंड देण्यासाठीही तयार आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली यापुढेही पक्ष कार्यरत असेल, असे सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले आहे.
डी. के. शिवकुमार यांच्या निवासस्थानी सीबीआयचा छापा
काँग्रेसचे कर्नाटक राज्याध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या निवासस्थानी आज सकाळी सीबीआय अधिकाऱ्यांनी छापा टाकला.
सदाशिव नगर येथील निवासस्थानी तसेच कानाकपुर येथील घर, आणि डीकेशींचे भाऊ डी. के. रवी यांच्या निवासस्थानावरही छापा टाकण्यात आला असून सीबीआय अधिकारी कागदपत्रे आणि इतर गोष्टींचा तपास करत आहेत.