जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची ऊस बिले थकीत आहेत. परिणामी शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून एम. के. हुबळी (जि. बेळगांव) येथील एका शेतकऱ्याने ऊस बिलासाठी स्वतःची समाधी स्वतःच खोदून खळबळ उडवून देताना वेगळ्या पद्धतीने राज्याचे लक्ष वेधले आहे. बिल तर नाही किमान अंत्यसंस्काराची मूठभर माती घालायला तरी या, असे भावनिक आवाहन या शेतकऱ्याने कारखान्याला केले आहे.
ऊस बिलासाठी स्वतःची समाधी खोदून त्यामध्ये बसून असलेल्या या शेतकऱ्याचे नांव शिवानंद बोगार असे आहे. जिवंत समाधी घेण्याच्या त्याच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सरकारी यंत्रणेला खडबडून जाग आली आहे. एम. के. हुबळी (जि. बेळगांव) येथील मलाप्रभा साखर कारखान्याने आपली उसाची बिले थकविल्याचा आरोप करीत शिवानंद बोगार हा शेतकरी समाधी घेऊन बसला आहे.
शिवानंद या शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 114 टन ऊस त्याने एम. के. हुबळी साखर कारखान्याला पाठविला होता. मात्र अद्याप 85 हजार रुपये बिल येणे बाकी आहे. यासाठी सातत्याने कारखान्याचे उंबरठे झिजवून देखील कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे आपण आर्थिक अडचणीत सापडलो असून मुलांची शालेय फी भरण्याचे पैसे देखील आपल्याकडे नाहीत. आपल्याला चरितार्थ चालवणे कठीण झाले असल्यामुळे मेलेले बरे असे वाटू लागले आहे, असे शिवानंद बोगार याने सांगितले. एकंदर आर्थिक अडचणीत सापडलेल्या शिवानंदने समाधीची शक्कल लढवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.