Sunday, December 22, 2024

/

रक्तदानासाठी चक्क बसच बेळगांवकडे वळवणारा “हा” खरा जीवन रक्षणकर्ता

 belgaum

तातडीने रक्ताची गरज असल्याची माहिती मिळताच श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेचे मुधोळ तालुका प्रमुख संजू घोरपडे यांनी तातडीने आपली बस बेळगांवकडे वळवून रक्तदान केल्यामुळे कॅसलरॉकच्या एका रुग्णाला जीवदान मिळाल्याची घटना काल घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, आयोध्यानगर येथील प्रभा हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या कॅसलरॉक येथील एका रुग्णाला “एबी निगेटिव्ह” या दुर्मिळ गटाच्या रक्ताची तातडीने गरज होती. रुग्णाच्या नातलगांना सलग दोन दिवस प्रयत्न करून देखील सदर रक्तगटाचा रक्तदाता अथवा रक्त मिळू शकले नाही. परिणामी त्यांनी काल सोमवारी शहरातील श्रीराम सेना हिंदुस्तानचे धडाडीचे कार्यकर्ते शंकर पाटील यांच्याशी संपर्क साधला. शंकर पाटील स्वतः रक्तदाते असल्यामुळे त्यांनी स्वतःकडील एबी निगेटिव्ह रक्तदात्यांची यादी तपासली. तेंव्हा सर्वांनीच अलीकडेच रक्त दिले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

बेळगांवात संबंधित रक्तगटाचा एकही रक्तदाता नसल्यामुळे पाटील यांनी श्रीराम सेना हिंदुस्तानचे मुधोळ तालुका प्रमुख संजू घोरपडे यांच्याशी संपर्क साधला तेंव्हा स्वतः एबी निगेटिव्ह रक्तदाते असणारे घोरपडे बसमधून प्रवास करत होते. रक्ताची तातडीने गरज असल्याची माहिती मिळताच संजू घोरपडे यांनी बस थेट बेळगांवकडे वळवली.

अवघ्या दीड-दोन तासात बेळगाव दाखल झाल्यानंतर त्यांनी तातडीने हॉस्पिटलकडे धाव घेऊन रक्तदान केल्यामुळे संबंधित रुग्णाचे प्राण वाचले. याप्रकारे शंकर पाटील आणि संजू घोरपडे हे उभयता खऱ्या अर्थाने कॅसलरॉकच्या त्या रुग्णाचे खऱ्या अर्थाने जीवन रक्षणकर्ता ठरल्याबद्दल रुग्णाचे नातलग त्यांना दुवा देत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.