बेळगावमध्ये डीएआर, सीएआर, पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या नेमणुकीसाठी परीक्षांचे आयोजन केले आहे. या परीक्षेत एकाच्या नावावर दुसऱ्याच उमेदवाराने हजेरी लावली. ही गोष्ट वेळीच लक्षात येताच त्या बोगस उमेदवारावर कारवाई करण्यात आली.
बेळगावच्या एका परीक्षाकेंद्रावर ही घटना घडली असून बोगस उमेदवाराचा प्रकार परीक्षकाच्या लक्षात येताच, त्या उमेदवाराची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला अटक करून पोलिसांनी माहिती घेतली. या माहितीमध्ये एकाच्या नावावर दुसराच उमेदवार परीक्षा देत असल्याचे निदर्शास आले आहे.
बेळगावमध्ये एपीसी (डीएआर / सीएआर) नेमणुकीसाठी सीईटी परीक्षा घेण्यात येत आहेत. या परीक्षांसाठी ६९०९ पैकी ५७६० जण परीक्षेला हजार होते. बेळगावमधील जैन कॉलेजमधील परीक्षा केंद्रावर या बोगस उमेदवाराची घटना घडली असून त्याच्यावर पीएस सीआर क्रमांक १२६/२० अंतर्गत प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
या परीक्षेत घडलेल्या एकंदर प्रकारावरून प्रामाणिक उमेदवारावर अन्याय होत असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. प्रामाणिकपणे या पदासाठी कष्ट करणाऱ्या उमेदवाराला अशा प्रकारचा बोगस उमेदवारामुळे पुढील काळात फटका बसण्याची शक्यता आहे.
शिवाय आज उजेडात आलेल्या या एका प्रकरणासह आणखी किती असे प्रकार घडत असतील? याची शहानिशा करणे गरजेचे आहे. बेळगावच्या या परीक्षाकेंद्रावर घडलेल्या या प्रकारात परीक्षकांनी दाखविलेल्या हजरजबाबीपणाचे कौतुक करण्यात येत आहे..