तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक आज कॉलेज रोड वरील समितीच्या कार्यालयात पार पडली. यावेळी येत्या १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनासंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर हे होते.
यावेळी उपस्थितांनी १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्यादिनानिमित्ताने आपापली मते बैठकीत मंडळी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काळा दिन पाळण्यास निर्बंध घातले आहेत. शिवाय मूक मोर्चालाही परवानगी नाकारली आहे. परंतु मराठी भाषिकांच्यावतीने या दिवशी मार्गसूची पाळून हा दिन आचरणात आणण्याचे निश्चित केले आहे.
केंद्र सरकारच्या विरोधात या दिवशी निषेध नोंदविण्यासाठी मराठी भाषिक एकत्र येतात. प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी मिरवणूक आणि काळा दिन पाळण्यासाठी निर्बंध लादले आहेत. परंतु या दिवशी निषेध हा नोंदविलाच पाहिजे, शिवाय मिरवणूक काढता आली नाही तरी घरोघरी लाक्षणिक उपोषण आणि घरोघरी काळे झेंडे लावून सरकारचा निषेध नोंदविण्यात यावा, असे मत तुरमुरी येथील समितीचे कार्यकर्ते सुरेश राजूकर यांनी व्यक्त केले.
याशिवाय गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने परवानगी नाकारली असेल, तर इतर मिरवणुकीप्रमाणे केवळ ५० जणांच्या उपस्थितीत काळ्या दिनाची मिरवणूक काढावी आणि यासाठी समितीने ५० जणांची नावे ठरवावीत, अशी सूचना मनोहर संताजी यांनी केली.
ग्रामीण भागात सर्व खबरदारी पाळून ५० जणांच्या उपस्थितीसह मूक मोर्चा काढावा, यासाठी संबंधित प्रशासनाची परवानगी घ्यावी अशी सूचना ऍड. सुधीर चव्हाण यांनी केली. शिवाय प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सहभागाने नेहमीच्या मिरवणूक मार्गावर मूक मोर्चा काढावा, सायकल फेरी काढावी, अशा सूचनादेखील कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्या.
बंगळूरसह अनेक ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हजारो कार्यकर्त्यांसमवेत राज्यकर्ते प्रचार करत आहेत. त्यामुळे केंद्र आणि कर्नाटक सरकारविरोधात आपला निषेध नोंदविण्यासाठी आपण मूक मोर्चा आणि सायकल फेरी काढावी, आणि सरकारच्या निदर्शनात आपला निषेध नोंदवावा, असे मत आर. आय. पाटील यांनी व्यक्त केले.
या बैठकीला तालुका समिती नेत्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक