महाराष्ट्रात जाण्याची आस सीमाभागातील प्रत्येक मराठी भाषिकांच्या मनात आहे. ज्येष्ठ नेत्यांपाठोपाठ गेली ३ ते ४ वर्षे सीमाभागात सीमालढ्यासाठी युवापिढी सक्रिय होत आहे. युवापिढीसाठी आकर्षण असणाऱ्या सोशल मीडियावर या सीमालढ्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून सीमालढ्याची तीव्रता प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी हॅशटॅग, फोटो फ्रेम आणि टॅगलाईन वापरण्याची क्रेझ सुरु झाली आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने गेली ३ ते ४ वर्षे सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी एका नव्या टॅगलाईनसह सीमाभागातील युवकांमध्ये जनजागृती करण्यात येते. यंदा ‘होय लढणार, जिंकणार, संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार करणार’ या टॅगलाईनसह सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून काही दिवसातच २०००० युवकांनी याला पाठिंबा दर्शविला आहे. युवा समितीच्या वतीने करण्यात येत असलेल्या या जनजागृतीचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सायकल फेरी आणि मूक मोर्चासंबंधी प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत या फेरीबाबत विचारविनिमय करण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान, १ नोव्हेंबर रोजी सुमारे १ लाख गॅस फुगे एका विशिष्ट संदेशासह आकाशात सोडण्याचा संकल्प असल्याचे, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे शुभम शेळके यांनी ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना दिली. याव्यतिरिक्त संपूर्ण बेळगावमध्ये विभागवार बैठक घेण्यात येत असून १ नोव्हेंबर रोजी कोणती रूपरेषा असेल, याबाबत या बैठकांमधून चर्चा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक गल्लीच्या फलकावरहि सीमालढ्याचे प्रतिबिंब झळकेल, गल्लीतील विशिष्ठ ठिकाणी १ नोव्हेंबर रोजी उपोषण, गावपातळीवर निषेध मोर्चा, अशा अनेक गोष्टींबाबत चर्चा करण्यात येत आहे. अशी माहिती शुभम शेळके यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सायकल फेरीबाबत साशंकता आहे, प्रशासनाच्यावतीने या फेरीसाठी आतापासूनच नकारघंटा वाजवली आहे. परंतु महाराष्ट्र एकीकरण समिती ही फेरी काढणारच या निर्णयावर ठाम आहे. त्याचप्रमाणे काळा दिन पाळू नये यासाठी प्रशासनाच्यावतीने दडपशाही करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे मराठी जनतेला आता मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक दुपारी ३.३० वाजता मराठा मंदिर येथे होणार आहे. या बैठकीत कलादिनाच्या रुपरेषेबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. घटक समित्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली आहेत. या बैठकीला सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष दीपक दळवी आणि कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले आहे.