कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्वच सण – उत्सव – सभा – बैठका – जत्रा – यात्रा आणि इतर समारंभावर निर्बंध घालण्यात आले आहेत. याच अनुषंगाने येत्या १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणार काळा दिन आणि त्यादिवशी निघणारी मूक सायकल फेरी यालाही जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दर्शविला आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने रामलिंग खिंड गल्ली येथील जतीमठ देवस्थानात महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी काळ्यादिनी कोणत्या गोष्टींचे अनुसरण करावयाचे आहे, यासंदर्भात चर्चा झाली असून सोमवारपासून काळा दिन कशापद्धतीने पार पडायचा आहे, याबाबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. गेली ६४ वर्षे सीमाभागातील मराठी भाषिकांवर सातत्याने होणार अन्याय, अत्याचार याविरोधात हा लढा आहे. या लढ्यासाठी कोणीही मराठी माणसांना रोखू शकत नाही. बंधनात घालू शकत नाही.
संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे आपण १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळू. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊनच या दिनाची आखणी करण्यात येणार असून यादिवशी प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्थेला कोणताही त्रास न देता, हा निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. केंद्राने केलेल्या अन्यायाविरोधात हा लढा असून हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील, असे मत युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी व्यक्त केले.
याव्यतिरिक्त या बैठकीत मराठी समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबतीतही चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून सीमाभागातील अनेक दानशूर व्यक्तींनी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावला आहे. दानशूर व्यक्तींकडून देण्यात येत असलेल्या देणग्यांचा योग्य पद्धतीने विनियोग करण्यासाठीही या बैठकीत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या मराठी विद्यार्थी संघटनेला याची जबाबदारी देण्यात येणार आहे.
१ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्यादिनाच्या बाबतीत समिती नेत्यांशी चर्चा करून याची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे. शिवाय या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. यासोबतच आगामी ग्रामपंचायत निवडणूक, महानगरपालिका निवडणूक आणि लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार उभा करण्याबाबत पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शुभम शेळके यांनी दिली.
यावेळी सुनील अष्टेकर, श्रीकांत कदम,धनंजय पाटील, साईनाथ शिरोडकर ,चंदू पाटील,आदी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते