राज्यात दुचाकी स्वारांना हेल्मेटची सक्ती करण्यात आल्यानंतर आता दुचाकीच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही (पिलीयन रायडर) हेल्मेटची सक्ती लागू करण्यात आली असून याच्या अंमलबजावणीला आज बुधवारपासून बेळगांवात प्रारंभ झाला आहे.
याआधी प्रथम दुचाकीस्वारांना नियमाची माहिती देऊन सोडून देण्यात येत होते. त्यानंतर हेल्मेट नसेल तर 1 हजार रुपये दंड आकारण्यात येत होता. आता हेल्मेट नसल्यास 1 हजार रुपये दंडासोबत तीन महिन्यासाठी वाहन परवाना रद्द करण्याचा नियम लागू झाला आहे. त्याच बरोबर दुचाकी चालकासह त्याच्या मागे बसणाऱ्या पिलीयन रायडरलाही हेल्मेटची सक्ती असणार आहे. याबाबत रहदारी पोलिस अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून यासंदर्भातील कारवाईला आज मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे.
केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकी चालकाला आणि त्याच्या मागे बसणार यालाही हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे हेल्मेट नसेल त्यांच्याकडून मोटार वाहन कायदा 1988 नुसार कलम 194 -डी अन्वये दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे आता दुचाकीस्वार व त्याच्या पाठीमागे बसणार्या व्यक्तीलाही दंड भरावा लागणार आहे. राज्य सरकारने गेल्या पाच दिवसापूर्वी हा नवा नियम काढला होता. मात्र बेळगांवात त्याची अंमलबजावणी केंव्हा होणार याकडे लक्ष लागून राहिले होते. मात्र आता आजपासून हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून बेळगांव आरटीओ कार्यालयाला यासंबंधी पत्र पाठविण्यात आले आहे. आजपासून हेल्मेट नसलेल्यांना 1000 रुपये तर वाहन विमा नसलेल्या चालकाला 2 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
अपघातात मृत्युमुखी पडणार यांपैकी बहुतांश लोकांचा मृत्यू हेल्मेट नसल्याने डोक्याला गंभीर इजा होऊन झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. याची गंभीर दखल घेऊन दुचाकीचालकासह पिलीयन रायडरलाहि हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. यासाठी 2019 मध्ये दुरुस्ती करण्यात आलेल्या मोटार वाहन कायद्यात याबाबतची तरतूद करण्यात आली होती. राज्य सरकारकडून गेल्या 20 ऑक्टोबर रोजी या बाबतचे पत्रक काढण्यात आले होते.
मात्र तब्बल सात दिवसानंतर या कलमाची अंमलबजावणी बेळगांवात झाली आहे.एकंदर यापुढे दुचाकीस्वारांना बरोबर मागे बसणाऱ्यांनाही आता हेल्मेट घालणे अनिवार्य असणार आहे. अन्यथा तीन महिन्यासाठी वाहन परवाना रद्द करण्यात येणार असून 1 हजार रुपये दंडही ठोठावण्यात येणार आहे.