कोविड पर्व सुरु झाल्यापासून प्रत्येकाच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून यासंबंधीच्या उपचारासाठी आणि इतर आजारांवरील उपचारासाठी रुग्णांच्या नातेवाईकांकडून उकलण्यात येणारा अवाढव्य खर्च आणि रुग्णालयांचा चाललेला मनमानी कारभार याविरोधात आज तालुक्यातील अनेक गावातील जनतेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आणि यासंबंधी योग्य तो निर्णय घेऊन जनतेची लूट थांबवावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
मार्च महिन्यापासून सर्वत्र धुमाकूळ घातलेल्या कोरोनाचा धसका प्रत्येकाने घेतला आहे. यादरम्यान केवळ शासकीय रुग्णालयात यावर उपचार सुरु होते. शिवाय इतर आजारांवरील उपचारांसाठी इतर रुग्णालये बंद असल्यामुळे सर्वसामान्य आजारांवरील उपचारासाठी नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सरकारने खाजगी रुग्णालयातूनही कोविड उपचारा सुरु करण्याचे आदेश दिले. परंतु या रुग्णालयातून सर्वसामान्य नागरिकांची उपचाराच्या नावाखाली लूट होत असून, रुग्णालयातून सुरु असलेला हा प्रकार वेळीच थांबवावा अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी जि. पं. सदस्य सरस्वती पाटील यांनी रुग्णालयात सुरु असलेल्या या मनमानी कारभाराची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. कोरोनावरील उपचारासाठी हजारो रुपयांची आकारणी करण्यात येत असून, पीपीई किट्स, रूम भाडे, नर्सिंग चार्जीस आणि इतर गोष्टींसाठी पैसे उकळले जात आहेत. परंतु आकारण्यात येणाऱ्या शुल्काप्रमाणे कोणतीही सेवा देण्यात येत नाही. या व्यतिरिक्त सर्वसामान्य आजारांसाठीही वाट्टेल तसे शुल्क आकारण्यात येत आहेत. शिवाय कोविड वॉर्डच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत असून कोणाचाही वचक नसल्याप्रमाणे अनागोंदी कारभार सुरु आहे. या सर्व गोष्टी सरस्वती पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन या प्रकारावर वेळीच रोख लावून योग्य तो क्रम उचलावा अशी विनंती केली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना कॉ. नागेश सातेरी म्हणाले कि, कोविड हॉस्पिटल म्हणून उपचाराच्या नावाखाली खाजगी रुग्णालयातून लूट करण्यात येत आहे. सामान्यपणे तपासणी करून प्रत्येक गोष्टीच्या नावावर वेगवेगळ्या पद्धतीने बिल आकारणी करण्यात येत असून केवळ पैसे उकळण्याचे काम अनेक रुग्णालयातून करण्यात येत आहे. आधी पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आणि नंतर अचानक निगेटिव्ह रिपोर्ट्स.. या भानगडीत घाबरलेल्या अनेक रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. शिवाय रुग्णांच्या उपचाराचे बिल लाखांच्या घरात येत आहे. या प्रकारावर प्रशासनाने त्वरित लक्ष पुरवून चौकशी करावी, आणि अतिरिक्त आकारण्यात आलेले उपचाराचे शुल्क रुग्णाच्या नातेवाईकांना परत करावेत, अशी मागणी अनेक गावातील ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
यावेळी आर. आय. पाटील, विकास कलघटगी, नागेश सातेरी, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, बी. डी. मोहनगेकर, मधू बेळगावकर, यांच्यासह अनेक गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कोविड उपचारात अवाढव्य पैसे उकळणाऱ्या इस्पितळाना आवरा-विविध संघटना व ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी यांना साकडे
#covidtreatment
#belgaumlive
#belgaumdistrictadministration
https://www.facebook.com/375504746140458/posts/1245094725848118/