बेळगावच्या राजकीय वर्तुळात सध्या डीसीसी बँक निवडणुकीची चर्चा रंगत आहे. एकूण 18 पैकी 12 हुन अधिक जागा बिन विरोध करण्यात जिल्ह्यातील भाजप नेत्यांना यश आले आहे. उर्वरित चार जागा देखील बिनविरोध निवडून आणून सहकार क्षेत्रात खेळीमेळीचे वातावरण जपू अशी भूमिका कत्ती बंधू, जारकीहोळी बंधू आणि सवदी यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी घेतली नाही. मात्र या बिनविरोध निवडणुकीला सर्वाधिक धक्का खानापूर तालुक्याने दिला आहे.
डी सी सी बँकेचे विद्यमान सदस्य आणि माजी आमदार अरविंद पाटील यांच्यासाठी आमदार अंजली निंबाळकर यांनी निवडणूक रिंगणात उतरून आव्हान उभे केले आहे. विशेष म्हणजे खानापुरात अंजली निंबाळकर यांना महाराष्ट्र एकीकरण समितीचा दुसरा गट भाजप ,आणि इतरांचा पाठिंबा आहे. तर अरविंद पाटील यांना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा पाठिंबा आहे.एकूणच खानापुरात राष्ट्रीय पक्ष समितीचा दुसरा गट विरुद्ध अरविंद पाटील अशी लढत निर्माण झाली आहे.
खानापूर तालुक्यात कुणीही निवडून येऊ देत डी सी सी बँकेवर जाणारा सदस्य हा मराठी भाषिकच असणार आहे. परंतु अरविंद पाटील यांची निवड झाली तर मागील वेळेप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीचा डी सी सी बँकेतील एकमेव मराठी सदस्य असणार आहे. खानापूर तालुक्यातील डी सी सी बँकेसाठी मतदान करणाऱ्या 51 पैकी जवळपास 31 संस्था मराठी भाषिकांच्या हातात आहेत. त्यामुळे या बँकेत गेली अनेक वर्षे मराठी भाषिक उमेदवार निवडून येत आहे.
अरविंद पाटील खानापुरात राष्ट्रीय पक्षाविरोधात एकाकी झुंज देत आहेत. मराठी बाणा टिकवण्यासाठी लढत आहेत. जसे खानापूर तालुक्यात मराठी सदस्य संख्या अधिक आहे त्याच धर्तीवर बेळगाव तालुक्यात देखील डीसीसी बॅंकेवर मतदान करणाऱ्या पथसंस्था अधिक आहेत. ज्याप्रमाणे खानापुरातून मराठी सदस्य डीसीसी बँकेवर जाऊ शकतो त्याच प्रमाणे बेळगाव तालुक्यातून देखील मराठी सदस्य डीसीसी बॅंकेवर गेला असता. मात्र तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते राष्ट्रीय पक्षांच्या मायाजालात अडकल्याने व समितीतून भाजप मध्ये उडी टाकलेल्या मराठी नेत्यांच्या उचापतींमुळे डीसीसी बँकेत बेळगाव तालुक्यात कन्नड उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.
सदर कन्नड भाषिकाला बिन विरोध करण्यासाठी समितीतून राष्ट्रीय पक्षात गेलेल्या नेत्याने पुढाकार घेतला होता अनेक मराठी मते विकत घेतली होती त्यामुळे दिल्या ‘घरी तू सुखी रहा समितीत ढवळा ढवळ करू नकोस’ असं म्हणायची वेळ आली आहे.
तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर डी सी सी बँकेसाठी बेळगाव मधून इच्छुक होते. मात्र तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समिती रसातळाला पोहोचवलेल्या काही नेत्यांनी अष्टेकरांना चक्रव्यहात अडकून त्यांचा अभिमन्यू केला. खानापूर तालुक्यातुन माजी आमदार अरविंद पाटील हे राष्ट्रीय पक्षांना डीसीसी बँकेत शड्डू ठोकू शकतात तर बेळगावात हे का शक्य नाही? याबद्दल मराठी जनतेतून चर्चा सुरु झाली आहे.