मातृत्वासोबत कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी समाजातील नवदुर्गा ‘बेळगाव लाईव्ह’ च्या माध्यमातून प्रकाशझोतात आणत आहोत. नवदुर्गा.. ज्यांनी स्त्री-पुरुष या भेदापलीकडे जाऊन पुरुषाच्या बरोबरीने अनेक क्षेत्रात पुढाकार घेतला आहे.. अशा नवदुर्गांची कहाणी आपण पाहणार आहोत.. आज नवरात्रीची दुसरी माळ.. यानिमित्ताने बेळगावसह अनेक ठिकाणी शिवरायांच्या किर्तीचा डंका वाजविणाऱ्या आणि शिवाजी महाराज सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत असणाऱ्या स्वाती कदम – गेंजी यांच्याशी केलेली बातचीत…
छत्रपती शिवरायांच्याबद्दल अनेकांच्या मनात एक अनमोल स्थान आहे. या शिवरायांचा वारसा घेऊन त्यांच्या तत्वांची आणि विचारांची ज्योत सर्वदूर पसरविणाऱ्यांपैकी बेळगावमधील एक शिवकन्या सर्वदूर पोहोचत आहे. मूळच्या हुबळीच्या आणि सध्या बेळगावमध्ये राहणाऱ्या स्वाती महादेव कदम यांचा विवाह गौरांग गेंजी यांच्याशी झाला. लग्नाआधीही वडिलांकडून मिळत असलेले शिवरायांबद्दलचे ज्ञान आणि शिवरायांची विचारधारा असलेल्याच घरी विवाह झाल्यामुळे त्यांच्या मनात असलेली शिवरायांबद्दलचा आदर आणि अभिमान प्रफुल्लित झाला. बेळगाव परिसरासह अनेक ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या मूर्ती स्थापनेपासून ते छत्रपतींच्या आदर्शाची महती प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा मानस आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजल्यापासून स्वाती गेंजी यांना शिवरायांबद्दल अत्यंत आत्मियता वाटू लागली. आपल्याकडे असलेली माहिती ही कमीच आहे असे प्रत्येक वेळी त्यांना वाटत गेले. त्यानंतर त्यांनी शिवरायांबद्दलचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्याचे ठरवले. आणि इथूनच शिवरायांच्या कार्याबद्दल त्यांना उत्सुकता वाढू लागली. त्यांची उत्सुकता इतकी वाढत गेली त्यानंतर त्यांनी शिवरायांबद्दल होत असलेल्या प्रत्येक गोष्टीत आपला सहभाग नोंदविला. गडकिल्ल्यांची स्वच्छता असो किंवा महाराजांविषयी कोणताही कार्यक्रम असो.. अशाठिकाणी त्या हिरीरीने भाग घेतात. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना शिवकन्या म्हणून ओळखले जाऊ लागले. मातृभाषा कन्नड असूनही मराठीसाठी त्यांचे कार्य अखंडितपणे सुरु आहे.
जवळपास मराठी जनतेला शिवरायांचा इतिहास संपूर्णपणे माहित नाही. हा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करण्याचा त्यांचा मानस आहे. यासंदर्भात मराठा समाजातील अनेक मान्यवरांसोबत त्यांनी बैठका घेतल्या आहेत. गेली ४ वर्षे सातत्याने हे कार्य त्या करत असून नुकत्याच साजरा झालेल्या मराठा शौर्य दिनी त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा सन्मानही करण्यात आला आहे.
कित्येक मराठी लोकांना शहाजी महाराजांच्या समाधीबद्दल माहिती नाही. दावणगिरी येथे शहाजी महाराजांची समाधी असून या समाधीच्या ठिकाणी मंदिर उभारण्याची संकल्पना त्यांनी विविध मान्यवरांच्या सहकार्याने मंडळी आहे. यासंदर्भात कागदपत्रांची छाननी सुरु असून समाधीस्थळ आणि मंदिर उभारण्यासाठी कोणत्याही सरकारी निधीविना मराठी समाजातील मान्यवर आणि नागरिकांच्या खर्चातून हे कार्य करण्यात येत आहे. यासाठी सातारा, कोल्हापूरयेथील मराठा समाजातील मान्यवरांची त्यांनी भेट घेतली आहे.
हल्ली अनेक मुलांना छत्रपती शिवरायांबद्दल खूप कमी माहिती आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक मुलाला शिवराय जाणून घेतले पाहिजेत, यासाठी पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या कालावधीत त्यांनी साप्ताहिक शिबीर घेण्याचे ठरविले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मणगुत्ती आणि पिरनवाडी येथील छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती बाबत जे वाद सुरू होते त्या ठिकाणी पती गौरांग यांच्या सोबत स्वाती गेंजी या स्वता जातीने हजर होत्या व घोषणाबाजी करत होत्या.
या व्यतिरिक्त त्यांना त्यांचे पती गौरांग गेंजी यांचीही मोलाची साथ लाभते. प्रत्येक रविवारी रस्त्यावरील बेवारस कुत्री आणि इतर जनावरांना अन्न पुरवण्याचे कार्य त्या करतात. याशिवाय अनेक एनजीओंनाही त्यांनी मदत केली आहे. समाजातील प्रत्येक गरजू घटकाला आपल्यापरीने सर्वतोपरी मदत करावी, माणुसकी जपावी, आणि विशेषतः प्रत्येक तरुणीने आपल्या रक्षणाचा मार्ग ठामपणे अवलंबावा असा सालही त्यांनी दिला आहे.
शिवकन्या स्वाती गेंजी यांच्या कार्याला ‘बेळगाव Live’ चा सलाम. आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा !
-वसुधा कानूरकर सांबरेकर.