पतंगाच्या मांजामुळे रस्त्यावरून ये-जा करणारे जखमी होण्याचे प्रकार घडत असतात. कपलेश्वर उड्डाणपुलाजवळ अलीकडेच असा प्रकार घडल्यामुळे भाजप नेते आणि कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा कार्यदर्शी किरण जाधव यांनी आज या उड्डाणपुलाला भेट देऊन पाहणी केली.
सध्या अनेक लहान मुले आणि युवक पतंग उडवताना दिसून येत आहेत. मागील आठवड्यात पतंगाचा मांजा बनविणे आणि त्याची विक्री करणे यावर बंदी घालण्यात आली होती. परंतु फारसा फरक पडला आहे, असे जाणवत नाही. कारण अलीकडेच कपिलेश्वर उड्डाण पुलाजवळ मांजा गळ्यात अडकून एक युवक जखमी झाला होता. त्याचप्रमाणे मागील वर्षी गांधीनगर येथे एका युवकाचा अश्याच दुर्घटनेत मृत्यू देखील झाला होता.
या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन व स्थानिक लोकांच्या तक्रारीस मान देऊन आज भाजप नेते, कर्नाटक राज्य ओ.बी.सी. मोर्चा कार्यदर्शी किरण जाधव यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवून घटनास्थळी भेट दिली. या भेटीदरम्यान जाधव यांनी कपिलेश्वर उड्डाणपुलाची संपूर्ण पाहणी केली व समस्या दोन दिवसात सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी गळ्याला मांजा लागून जखमी झालेल्या युवकाचीही विचारपूस केली.
याप्रसंगी गजेश नंदगडकर, राजन जाधव , कपिल देसाई आदींसह भाजपचे कार्यकर्ते, महानगर पालिकेचे अधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. यासंदर्भात “बेळगाव लाईव्ह”शी बोलताना किरण जाधव यांनी आपण आपले आश्वासन कशा पद्धतीने पूर्ण करणार याची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कपिलेश्वर उड्डाणपुलावर रेणुका हॉटेलपासून श्री शनि मंदिरापर्यंत पुलाच्या दुतर्फा असलेल्या विजेच्या खांबाना 10 फूट उंचीवर जाळी लावली जाईल किंवा वायर बांधण्यात येईल, जेणेकरून तुटलेल्या पतंगांचा मांजा रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना इजा पोहोचवू शकणार नाही.
कपिलेश्वर उड्डाणपुलाप्रमाणे रूपाली चित्रपटगृहाजवळील उड्डाणपूल आणि गांधीनगर येथील उड्डाणपुलाच्या ठिकाणी वरीलप्रमाणे उपाय योजना केली जाणार आहे.