बेळगांव लोकसभा निवडणुकीसाठी खासदारकीचे तिकीट कोणाला मिळणार? याबाबतची चर्चा सुरू झालेली असताना केएमएफचे संचालक व जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचे सुपुत्र के. अमरनाथ यांनी खासदारकीच्या तिकीटबाबत वक्तव्य केले आहे. बेळगावच्या खासदारकीच्या निवडणुकीसाठी रमेश जारकीहोळी यांच्या या पुत्राच्या नांवाचीही सध्या चर्चा सुरू आहे.
मी वयाने खूप लहान आहे. मला अजून खूप कांही शिकायचे आहे मी सध्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असल्यामुळे मला अजून बरेच कांही आत्मसात करावयाचे आहे, असे वक्तव्य के. अमरनाथ यांनी केले आहे.
माझे वडील रमेश जारकीहोळी हे कर्नाटक सरकारमध्ये मंत्री आणि गोकाक विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत. गोकाकच्या जनतेच्या समस्या सोडविणे हे आमचे कर्तव्य आहे. यापैकी बरीचशी जबाबदारी माझ्यावर आहे. मला प्रथम त्याची पूर्तता करावयास हवी असेही के. अमरनाथ यांनी स्पष्ट केले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांनी बेळगांव लोकसभा मतदार संघासाठी अनेक लोकोपयोगी कामे सुरू केली होती, ती कामे पुढे चालू ठेवून पूर्णत्वास नेण्यासाठी एक चांगला कर्तबगार माणूस निवडून देणे गरजेचे आहे. तेंव्हा आपण सर्वजण मिळून हे काम करूया, असेही ही के. अमरनाथ यांनी सांगितले.