उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार -हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ गजाआड करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी बेळगाव जिल्हा वाल्मिकी नायक समाजासह विविध संघटनांनी आज भव्य मोर्चा काढून राष्ट्रपतींच्या नांवे जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले.
बेळगांव जिल्हा वाल्मिकी नायक समाज, अखिल कर्नाटक वाल्मिकी नायक महासभा, कर्नाटक राज्य परिशिष्ट जाती सरकारी नोकर संघ व श्री वाल्मिकी मंदिर मेहतर समाज सुधारणा मंडळ कॅम्पसह अन्य विविध संघटनांनी आज सकाळी संयुक्तरित्या भव्य मोर्चा काढून उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार -हत्या प्रकरणाचा तीव्र निषेध केला. शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात या भव्य मोर्चाची सांगता झाली. मोर्चादरम्यान निषेधाच्या घोषणा देण्यात बरोबरच हाथरस प्रकरणात बळी गेलेल्या दुर्दैवी मनीषा वाल्मिकी हिच्या नांवे घोषणा दिल्या जात होत्या. मिरवणुकीच्या अग्रभागी धरण्यात आलेले विविध संघटनांचे बॅनर आणि मोर्चेकऱ्यांच्या हातातील झेंडे सार्यांचे लक्ष वेधून घेत होते.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोर्चाची सांगता होताच, हाथरस बलात्कार -हत्या प्रकरणी राष्ट्रपतींच्या नांवे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकार्यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. राष्ट्रपतींना धाडण्यात आलेल्या या निवेदनात उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार -हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ गजाआड करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी, देशाची राजधानी नवी दिल्ली आणि राज्याची राजधानी बेंगलोर येथे मनीषा वाल्मिकी हीचे स्मारक उभारण्यात यावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
निवेदन सादर करतेवेळी बेळगाव जिल्हा वाल्मिकी नायक समाजाचे जिल्हाध्यक्ष राजशेखर तळवार, अखिल कर्नाटक वाल्मिकी नायक महासभेचे जिल्हाध्यक्ष अजित नाईक, कर्नाटक राज्य परिशिष्ट जाती सरकारी नोकर संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वंगण्णावर, श्री वाल्मिकी मंदिर मेहतर समाज सुधारणा मंडळ कॅम्पचे अध्यक्ष शेखर छाब्री आदी नेते मंडळींसह वाल्मिकी समाज तसेच अन्य संघटनांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
जायंट्स सखीने केला हाथरस घटनेचा तीव्र निषेध
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेध जायंट्स सखीने केला.
महिला आणि मुलींच्यासाठी कार्य करत असलेल्या जायंट्स सखी या सेवाभावी संघटनेची तातडीची बैठक घेण्यात आली
उत्तर प्रदेशातील हाथरस जिह्यातील एका महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. त्यांनतर सदरी महिला उपचारादरम्यान मरण पावली. या घटनेनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्या महिलेच्या कुटुंबियांना घरात डांबून ठेवत अर्ध्या रात्री मयताच्या प्रेतावर अंत्यसंस्कार केले. ही सर्व घटना निंदाजनक असून अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा म्हणजेच आरोपींना फासावर लटकवून मृत्युदंडाची शिक्षा द्यावी अशा मागणीसह या घटनेचा तीव्र शब्दात जाहीर निषेध या बैठकीत करण्यात आला.
हाथरसमध्ये जी घटना घडली आहे ती पाशवी आहे. आजही महिला आणि मुली असुरक्षित आहेत असेच म्हणावं लागेल.
अशा घटना घडल्या की काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचे असे होऊन चालणार नाही. ह्यावेळेस अशा प्रवृत्तींच्या विरोधात सरकारने कठोर पावलं उचलली पाहिजेत जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.