देशातील बेळगांव, जळगांव, खजुराहो, कलबुर्गी, लिलाबारी आणि सालेम या सहा विमानतळांवर फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन स्थापण्याच्या दृष्टीने आखलेल्या धोरणाला सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे चेअरमन अरविंद सिंग यांनी दिली आहे.
नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सिंग यांनी उपरोक्त माहिती दिली. देशात वैमानिकांचा तुटवडा असून वैमानिकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कमी वापराच्या विमानतळांचे फ्लाईंग स्कूलमध्ये परिवर्तन करण्याची मुलभूत योजना असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान यापूर्वी 2018 साली तत्कालीन केंद्रीय नागरी विमान वाहतूक खात्याचे राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी बेळगांवात अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना विमान वाहतूक (एव्हिएशन) क्षेत्रात करिअर घडवता यावे यासाठी याठिकाणी फ्लाईंग क्लब अथवा अकॅडमी स्थापन करण्याची सूचना केली होती. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले होते सदर फ्लाईंग स्कूलसाठी ऑपरेटरची निवड स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे केली जाणार असून यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाही भाग घेण्याची परवानगी असणार आहे.