‘हेडलाईन’ वाचून थोड्या वेळासाठी आपल्या डोक्यात विचार आले असतील. अगदीच विचार करण्यासारखे नवे काही नाही तर सरकारी कामाच्या भोंगळपणाचा एक नमुना आहे. सरकारी कामकाजाबाबत अपवाद वगळता प्रत्येक कामात काहीना काही घोळ घातलेला दिसून येतो. मूलभूत सुविधांच्या बाबतीतील सरकारी कामे असो, किंवा मग वैयक्तिक पातळीवरील सुविधा असोत.
प्रत्येक कामात नुसता घोळ दिसून येतो. त्यात अनेक सरकारी कर्मचारी हे केवळ ‘पट्टी पाडून पगार मिळविणे’ या श्रेणीतील असतात. परंतु याचा फटका मात्र अनेकवेळा जनतेला बसतो. याचा जाब विचारायला गेलात तर वादावादी किंवा मग अगदीच पोलीस चौकीपर्यंत प्रकरण जाते.
जनता चुकली कि जनतेसाठी कायदा आणि पर्यायाने कारवाई आहे. परंतु प्रशासनाची काही चूक असेल तर मात्र या चुकीला कायदा नसतो. बेळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या बेळगाव-बागलकोट या महामार्गाजवळील दिशादर्शक फलकावर एक विचित्र अशी चूक करण्यात आली आहे. त्याचेच उदाहरण आपण वरील छायाचित्रात पहिले असेल.
महामार्गावर आपल्या माहितीसाठी रस्त्याच्या शेजारी दिशादर्शक फलक लावण्यात येतात. या फलकांवर गाव, विभाग, अंतर, गावाची व्याप्ती, लोकसंख्या अशा अनेक गोष्टींची नोंद करण्यात आलेली असते. एखाद्या ठिकाणी जाताना हे फलक अत्यंत फायदेशीर ठरतात. परंतु अशा फलकांवर चुका झाल्या तर मात्र एखाद्या नव्याने मार्गस्थ होणाऱ्याची फजिती होऊ शकते.
जरी हे फलक कंत्राटदारांच्या माध्यमातून बसविण्यात आले असले तरी हे काम कोणत्या दर्जाने केले गेले आहे, याची पडताळणी करणे हे त्या-त्या विभागाच्या प्रशासनाने पाहणे गरजेचे आहे.
बेळगाव जिल्ह्यातील बागलकोट महामार्गावर नुग्गानट्टी गावाजवळ बसविण्यात आलेल्या फलकावर नुग्गानट्टी या गावची माहिती देण्यात आली आहे. एका फलकावर या गावच्या लोकसंख्येबद्दल माहिती देताना यात एक विचित्र अशी चूक करण्यात आली असून लोकसंख्येएवजी “आत्मा” असा उल्लेख करण्यात आला आहे. इंग्रजी मध्ये ‘SOULS : 1833 ‘ असा उल्लेख करण्यात आला असून या मार्गावरून मार्गस्थ होणाऱ्याना हा कुतूहलाचा विषय ठरतो आहे.
तर काही लोकांकडून या गोष्टीची हसण्यावारी मजा करण्यात येत आहे. या गावात चक्क १८३३ आत्मा राहतात आणि याची मोजणीही करण्यात आली आहे असा उपहासही करण्यात येत आहे.
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना याविषयी माहिती देण्यात आली असता, या रस्त्याला आपण अजून भेट दिली नसून एठिकाणी असलेल्या फलकाबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
हे कामकाज के-शिप म्हणजेच कर्नाटक स्टेट हाइवेज इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्टच्या अंतर्गत करण्यात आले असून या फलकावर चूक झाली नसून विदेशी फलकांवर लोकसंख्या नमूद करताना ‘souls ‘ असाच उल्लेख करतात. त्या अनुषंगाने हा फलक बनविण्यात आला आहे, अशी सारवासारव कार्यकारी अधिकारी संजीवकुमार हुलकायी यांनी केली आहे.