पूर्वापार परंपरा खंडित होऊ नये यासाठी कोरोना संदर्भातील शासनाचे सर्व नियम व अटी पाळून उद्या रविवारी विजयादशमी दिवशी शहरातील सीमोल्लंघनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यासाठी अत्यंत साधेपणाने पालखी व नंदी मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच फक्त शहर देवस्थान कमिटी आणि चव्हाट गल्ली देवस्थान कमिटीच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होणार आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे यावेळी परंपरेनुसार शहरातील पालखी मिरवणूक व सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होणार की नाही? याबद्दल साशंकता निर्माण झाली होती. तथापि शहर देवस्थान कमिटी आणि चव्हाट गल्ली देवदादा सासन काठी देवस्थान कमिटी यांच्या प्रयत्नामुळे प्रशासन व पोलीस खात्याकडून कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने पालखी मिरवणूक व सीमोल्लंघन कार्यक्रम करण्यास परवानगी मिळाली आहे.
दरवर्षी विजयादशमी दिवशी सीमोल्लंघनाचा निमित्ताने शहरात 12 पालख्या निघतात. या सर्व पालख्यांची ज्योती मैदानावर सीमोल्लंघनाचा ठिकाणी सांगता होते. परंतु यावेळी चव्हाट गल्ली देवस्थान वगळता इतर देवस्थानांच्या हक्कदार व पुजाऱ्यांनी कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन यावेळी मुख्य पालखी मिरवणुकीत सहभागी होणार नसल्याचे लेखी पत्र यापूर्वीच पोलीस खात्याकडे दिले आहे. त्यामुळे यंदा फक्त चव्हाट गल्ली येथील पालखी सीमोल्लंघनाच्या ठिकाणी जाणार आहेत.
आता उद्या विजयादशमी दिवशी दुपारी प्रशासनाने घालून दिलेल्या वेळेनुसार चव्हाट गल्ली येथून देव दादा सासनकाठी पालखी आणि मानाचा नंदी ज्योती कॉलेज मैदानावरील सीमोल्लंघनाचा ठिकाणी रवाना होतील. मोजक्याच मानकऱ्यांसह पालखी मिरवणूक मार्गावर कोठेही न थांबता थेट सीमोल्लंघनाचा ठिकाणी जाणार असल्यामुळे नागरिकांना रस्त्यावर पालखी पूजन करता येणार नाही. त्याचप्रमाणे सीमोल्लंघनाचा ठिकाणी ज्योती मैदानावर शहर देवस्थान कमिटी आणि चव्हाट गल्ली देवदादा सासन काठी (ज्योतिर्लिंग) देवस्थान कमिटीच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांसह उत्सवाचे मानकरी बेळगांवचे वतनदार चव्हाण -पाटील घराण्यातील मंडळी उपस्थित असतील. त्याचप्रमाणे पूर्वीप्रमाणे सूर्यास्ताची वाट न पाहता होईल तितक्या लवकर दुपारीच सीमोल्लंघनाचा कार्यक्रम विधीवत पार पाडला जाईल, असे शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील यांनी सांगितले आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व पोलीस खात्याचा आदेश असल्यामुळे उपरोक्त मंडळीं खेरीज इतर कोणीही नागरिकांनी सीमोल्लंघनासाठी ज्योती मैदानाकडे फिरकू नये. नागरिकांनी आपापल्या घरी विजयादशमी अर्थात सीमोल्लंघन साजरे करून सहकार्य करावे, असे आवाहन रणजीत चव्हाण -पाटील, लक्ष्मण किल्लेकर, सुनील जाधव, नागेश नाईक, प्रताप मोहिते, अभिजीत आपटेकर यांच्यासह शहर देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे