बेळगाव जिल्ह्यातील कोविड परिस्थिती सध्या आवाक्यात येत आहे, शिवाय १०० पैकी ९४ रुग्ण हे कोविडमुक्त होत असून मृत्यूमध्येही घट होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली.
शनिवारी यासंदर्भात बोलताना ते म्हणले की आजपर्यंत २४०३९ रुग्णांना कोविड ची लागण झाली असून त्यापैकी २३०२० रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आता ९६१ रुग्ण कोविड वर उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण ३२८ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला असून मागील पंधरवड्यात शेकडा ०.४ टक्के तर आठवड्याभरात हे ०.५ टक्के इतके मृत्यूचे प्रमाण आहे.
त्याचप्रमाणे संसर्ग होण्यामध्ये शेकडा ५.४ टक्के इतके प्रमाण आहे.
बेळगाव जिल्ह्यात दररोज २३०० रुग्णांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. मागील ३ दिवसांपासून संसर्ग पसरण्याची आकडेवारी शेकडा ५.४ वरून ३.७ टक्के इतकी झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी आज दिली.
कोविडच्या आकडेवारीत घट जरी होत असली तरी जनतेने कोविड संदर्भातील सर्व खबरदारी आणि सरकारी मार्गसूचीचे पालन करावे, मास्क आणि सॅनिटायझर तसेच सामाजिक अंतर राखून सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.