आवक वाढल्यामुळे बेळगाव कृषी उत्पन्न बाजार पेठेतील अर्थात एपीएमसी मार्केट यार्डमधील रताळ्याचा दर आज बुधवारी 100 रुपयांनी घसरला होता. रताळ्यांचा दर आज प्रति क्विंटलला 850 ते 1000 -1050 रुपये इतका होता.
बेळगाव एपीएमसी मार्केट यार्ड येथे चंदगड तालुक्यातसह बेळगांव तालुक्यातील किणये, भादरवाडी आदी गावांमधून रताळ्याची आवक होत असते.
काल दुपारपर्यंत एपीएमसी मार्केट यार्डमध्ये रताळ्याच्या 5 हजार पोत्यांची आवक झाली होती. तसेच प्रतिक्विंटल दर 900 ते 1100 रुपये इतका होता. तथापि आज बुधवारी यार्डात 10 ते 11 हजार रताळ्याच्या पोत्यांची आवक झाली आहे. आवक वाढल्यामुळे प्रति क्विंटल रताळ्याच्या दरात कालच्यापेक्षा आज घसरण झाली. आज प्रति क्विंटल रताळ्याचा दर 850 ते 1000 -1050 रुपये इतका होता.
दरम्यान, मागील वर्षी दसऱ्याच्या हंगामामध्ये रताळ्याचा दर प्रति क्विंटलला रुपये 1500 ते 2000 पर्यंत गेला होता. मात्र यंदा तो फारच कमी आहे. यावेळी कोरोना, लाॅक डाऊन आणि पावसामुळे रताळ्याची मागणी रोडावली असल्याचे एपीएमसी मार्केट यार्ड येथील व्यापारी सुनील अष्टेकर यांनी सांगितले.
यावेळी पावसामुळे रताळी काढणी जास्त झालेले नाही त्यामुळेच आवक म्हणावी तशी नसल्याचे, त्याचप्रमाणे पावसामुळे रताळ्याचा दर्जाही खालावला असून सध्याच्या रताळ्यांना पूर्वीसारखी सुपर क्वालिटी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरोना प्रादुर्भावामुळे उत्तर भारतातील मध्यप्रदेश, दिल्ली आदी राज्यातून होणारी रताळ्याची मागणीही यंदा झाली नसल्याची माहिती अष्टेकर यांनी दिली.