दरवर्षी 10 ऑक्टोबर हा दिवस “जागतिक ऑडिओलॉजिस्टि दिन” म्हणून साजरा केला जातो. ऑडिओलॉजिस्ट हे ऐकण्याच्या आणि शरीराच्या संतुलन राखण्याच्या समस्येवरील निदान आणि उपचार करणारे तज्ञ असतात. ऑडिओलॉजिस्ट हे क्षेत्र अद्याप समाजातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले नाही. जागतिक ऑडिओलॉजिस्ट दिनानिमित्त यासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी शहरातील कृष्णा स्पीच थेरपी सेंटर अँड हिअरींग क्लिनिंकचे ऑडिओलॉजिस्ट डॉ. नागनाथ एस. गोंड यांनी “बेळगांव लाईव्ह” ला दिलेली माहिती पुढील प्रमाणे आहे.
ऑडिओलॉजिस्ट या क्षेत्राची गरज जगाला 1940 पासून दुसऱ्या महायुद्धामुळे उद्भवलेल्या नाॅइज इंड्युस्ड हिअरिंग लाॅसमुळे भासू लागली. ऑडिओलॉजिस्ट हे तज्ञ प्रदीर्घ वर्षे ऐकण्याशी संबंधित कानाचा व त्याच्या ऐकण्याच्या प्रक्रियेचा सखोल अभ्यासक्रम पूर्ण करून व त्याच्या इंटरशिपच्या दरम्यान वेगवेगळ्या संस्थेमध्ये सराव करतात. पुढे रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया (आरसीआय) मार्फत नोंदणी क्रमांक मिळवल्यावरच समाज सेवेसाठी ते तयार होतात. त्यांचा नोंदणी क्रमांक हा “ए” या अक्षराने सुरू होतो. भारतात आरसीआय नोंदणीकृत ऑडिओलॉजिस्ट तज्ञांची संख्या ही साधारण 2500 इतकीच आहे.
हे ऑडिओलॉजिस्ट तज्ञ श्रवणदोषावर उपचार करण्याबरोबरच श्रवणदोष वाढू नये म्हणून किंवा होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मार्गदर्शन करतात. आपण दररोज वेगवेगळ्या ठिकाणी सतत ध्वनी प्रदूषणाला सामोरे जात असतो. मोबाईलवर आपण उच्च तीव्रतेचा आवाजात तासनतास गाणी ऐकत असतो किंवा संभाषण करत असतो. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब या व्याधींमुळे श्रवण दोषांचे प्रमाण वाढायला लागले आहे. या पद्धतीची समस्या असेल तर कोठे जायचे? कोणत्या तज्ञाचा सल्ला घ्यायचा? हा मोठा प्रश्न रुग्णांसमोर असतो. श्रवण दोषामुळे जीव तर जात नाही ना अशा भावनेपोटी आपण या समस्येकडे दुर्लक्ष करत असतो. त्यामुळे श्रवण दोष वाढत जावून रुग्णांमध्ये नैराश्य, उदासीनता व चिडचिडेपणा निर्माण होऊ लागतो. परिणामी श्रवणदोष असणारी व्यक्ती समाजापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करते किंवा समाजापासून विभक्त होते.
ऐकण्याशी संबंधित 80 टक्के समस्या ही अवैद्यकीय असते म्हणजे औषधोपचार किंवा शस्त्रक्रियेद्वारे बरी होत नाही. अशावेळेस ऑडिओलॉजिस्ट तज्ञांमार्फत श्रवण दोषाचे निवारण केले जाते. ऑडिओलॉजिस्ट तज्ञ जन्मजात मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांच्या ऐकण्याच्या समस्येवर वेगवेगळ्या निदानात्मक चांचण्या करतात. त्याचप्रमाणे सखोल अभ्यास करून जर व्यक्तीला सेंसरिन्युरल प्रकारचा श्रवणदोष असेल तर त्यांच्या श्रवणर्हासा अनुसार श्रवण यंत्र वापरण्यास मार्गदर्शन करतात. श्रवण यंत्र वापराचा सल्ला दिलेल्या व्यक्तीने जर त्याचा वापर केला नाही तर श्रवण दोष वाढत जातो आणि कालांतराने श्रवण यंत्र वापरून देखील कांही फायदा होत नाही.
समाजामध्ये श्रवण दोष समस्या वाढू लागली असताना ऑडिओलॉजीस्ट तज्ञांची संख्या मात्र कमी आहे. याचा फायदा अप्रशिक्षित लोकांकडून घेतला जात आहे. हे अप्रशिक्षित लोक रुग्णाच्या श्रवण प्रक्रियांचा अभ्यास न करता श्रवण यंत्र विकण्याचे काम करू लागले आहेत. दुर्दैवाने सदर अप्रशिक्षित लोकांमुळे बरीचशी कर्णबधिर मुले ही भाषा आणि वाचा विकासापासून दूर राहिली आहेत. अप्रशिक्षित लोकांना मानवाच्या शरीरातील ऐकण्याच्या प्रक्रियेचा सखोल अभ्यास नसल्यामुळे अशा व्यक्तींकडून श्रवण यंत्र बसवल्यानंतर कानातून कर्णकर्कश आवाज ऐकू येणे, अस्पष्ट ऐकू येणे, ऐकायला येणे पण शब्द न समजणे अशा बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते.
यासाठी आपण सर्वांनी जागतिक ऑडिओलॉजिस्ट दिनानिमित्त ऑडिओलॉजिस्ट क्षेत्रातबद्दल समाजात जनजागृती करून जगाला चांगले ऐकण्याचा अनुभव देण्याची गरज आहे, असे आवाहन कृष्णा स्पीच थेरपी सेंटर अँड हिअरींग क्लिनिंकचे ऑडिओलॉजिस्ट डॉ. नागनाथ एस.गोंड यांनी केले आहे.