कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून उच्च न्यायालयाने वकिलांना न्यायालय आवारात आपली वाहने पार्क करण्यास घातलेली बंदी आज उठविण्यात आली आहे. आता पूर्वीप्रमाणे वाहने पार्क करता येत असल्यामुळे वकील वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर तब्बल सुमारे 4 महिन्यापासून न्यायालय आवारामध्ये महनीय व्यक्ती वगळता वकिलांसह सर्वांनाच न्यायालय आवारामध्ये वाहने पार्क करण्यास बंदी घालण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या या आदेशाची बेळगाव न्यायालय आवारात अंमलबजावणी करण्यात आली होती.
तथापि या आदेशामुळे न्यायालयीन कामकाजासाठी वाहने घेऊन येणाऱ्याची विशेष करून वकीलवर्गाची मोठी गैरसोय झाली होती. कारण सर्वांना आपली वाहने न्यायालय आवाराबाहेर रस्त्याकडेला उभी करावी लागत होती. परिणामी वाहतुकीसही अडथळा निर्माण होत होता. नाराज झालेल्या वकिलांनी या विरुद्ध आवाज उठविला होता.
आता जवळपास महिन्यानंतर न्यायालय आवारात वाहन प्रवेश बंदीचा आदेश शिथील करण्यात आला असून वकीलवर्गाला आपली वाहने न्यायालय आवारात पार्क करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासाठी वकिलांकडे बेळगांव बार असोसिएशनचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
आज सोमवारपासून बेळगाव न्यायालय आवारामध्ये वकिलांना वाहनांसह प्रवेश देण्यात येत होता मात्र प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्तात ओळखपत्रे तपासली जात होती. न्यायालय आवारात आता पूर्वीप्रमाणे वाहने पार्क करण्यास परवानगी देण्यात आल्यामुळे वकीलवर्गात समाधान व्यक्त होत आहे.