कोरोना संदर्भात सातत्याने सूचना देऊन देखील जनतेकडून त्याचे पालन होत नसल्यामुळे कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. शहरी भागात 1 हजार रुपये तर ग्रामीण भागात 500 रुपये दंड वसूल केला जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. सुधाकर यांनी दिली. यासंदर्भातील अधिकृत आदेश गुरुवारी जारी करण्यात आला आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करण्याची सक्ती आहे. मात्र अनेक जण मास्क घालत नाहीत किंवा चुकीच्या पद्धतीने मास्क घालतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक आहे.
यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि जागृती करण्यासाठी दंडाची रक्कम वाढविण्यात आली आहे. पोलिसांनाही दंड वसुलीचे अधिकार देण्यात आले आहेत. आता पूर्णपणे मास्क न घालणाऱ्यांना देखील दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, असा इशारा डॉ. सुधाकर यांनी दिला आहे.
सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये फक्त 50 जणांना प्रवेश देता येईल. त्यापेक्षा अधिक जण एकत्र आल्यास आयोजकांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मास्कच्याबाबतीत बेळगाव महापालिकेच्या पथकांकडून मात्र पूर्वीच्या 100 रुपयांऐवजी आता 200 रुपये दंड वसूल केला जात आहे.