बेळगाव तालुक्यात जिल्ह्यात आणि संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत निवडणुका घेण्याच्या हालचाली निवडणूक आयोगाने सुरू केल्या आहेत. त्यामुळे साऱ्यांच्याच नजरा आता ग्रामपंचायत निवडणुकांकडे लागले आहेत. कधी एकदा निवडणूक जाहीर होते आणि कधी एकदा आपण अर्ज भरून निवडणूक लढवू असेच साऱ्यांना वाटू लागले आहे.
मात्र निवडणूक आयोगाने अजून तरी ग्रामपंचायत निवडणूक तारीख जाहीर केली नसून अनेकांच्या नजरा त्या तारखेकडे लागून राहिले आहेत. देशासह संपूर्ण जगात कोरोना महामारीमुळे भयभीत नागरिक यापासून वाचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र कोरोना काळातही बेळगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असल्याची चित्र दिसून येत आहे.
आतापासूनच अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे तर काही जणांनी मतदारांची मते जाणून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे निवडणुकीची धामधूम जोरदार सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मात्र निवडणूक आयोगाने अजूनही ग्रामपंचायत निवडणुकांची तारीख जाहीर केली नसल्याने अनेकांचा हिरमोड होत आहे. काहीजणांनी ओल्या पार्ट्या करण्यातही आता पासून सुरुवात केली आहे. अनेक समर्थक संबंधित नेत्याच्या प्रचारासाठी सरसावले आहेत. त्यामुळे कोरोनाला विसरून निवडणुकीच्या तयारीत अनेक जण गुंतल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
ग्रामपंचायत निवडणूक मे महिन्यात होणार होती. मात्र कोरोना महामारीमुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यात या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे अनेक जण आचारसंहिता आणि निवडणूक आयोग कधी एकदा निवडणूक जाहीर करणार याकडे नजर लावून आहेत.
दरम्यान निवडणूक आयोगाने आरक्षण जाहीर केले आहे. त्यामुळे त्याच्या कार्यक्षेत्रात अनेक इच्छुक जोरदार तयारी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. निवडणुक आयोग कधी एकदा निवडणूक जाहीर करणार याकडे सार्यांचे नजरा लागून राहिल्या आहेत.