मागील आठवड्यात दक्षिण विभाग रहदारी पोलिसांनी येडियुरप्पा मार्गावर केलेल्या हेल्मेटसक्तीच्या कारवाईविरोधात जनतेचा रोष ओढवून घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून रहदारी पोलीस विभागाच्यावतीने अशा कारवायांचा वेग वाढला आहे. आणि सक्तीही तीव्र करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम कठोर करण्यात आले असून नियम मोडणाऱ्यांवर सक्तीची कारवाई करण्यात येत आहे. परंतु या कारवाईविरोधात जनतेतून नाराजीचा सूर उमटत असून संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत.
आज कॅम्प परिसरातील हायस्ट्रीट येथील प्रार्थनास्थळाबाहेरील दुचाकी ‘नो पार्किंग’ च्या नावाखाली रहदारीपोलिसांनी उचलून नेल्या असून याबद्दल वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईही केली आहे. यामुळे येथे उपस्थित असलेल्या मुस्लिम बांधवांनी रहदारी पोलिसांच्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
हायस्ट्रीट, कॅम्प येथे असलेल्या मुस्लिम प्रार्थनास्थळामध्ये अनेक मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी येतात. साधारण १५ ते २० मिनिटे नमाज पठाण चालते. या प्रार्थनास्थळामध्ये अनेक ठिकाणाहून मुस्लिम बांधव येतात. हा रहिवासी भाग असून या भागात कोणत्याही प्रकारचा रहदारी फलक लावण्यात आला नाही. शिवाय याठिकाणी बस आणि ट्रकची वाहतूक होते.
रहिवासी भागात ही वाहतूक योग्य नाही. येथे येणाऱ्यांना वाहतुकीच्या नियमांबद्दल कोणतीच माहिती नसते. शिवाय १५-२० मिनिटांसाठी अत्यंत गडबडीत याठिकाणी वाहने लावून प्रार्थना आटोपून हे लोक निघून जातात. हीच वेळ साधून रहदारी पोलीस याठिकाणी दाखल होऊन दुचाकी उचलून घेऊन जातात. याठिकाणी प्रार्थनास्थळाबाहेर अनेक वाहने उभी असतात. मात्र पोलीस एखाद-दुसरेच वाहन उचलून घेऊन जातात. आणि या वाहनधारकांना १६०० ते २००० रुपयापर्यंतचा दंड ठोठावला जातो. रहदारी पोलीस आणि वाहनधारकांमध्ये अनेकवेळा बाचाबाची होते. यादरम्यान रहदारी पोलिसांकडून मानसिक रित्या चाल केला जातो, असा आरोप येथील उपस्थितांनी केला आहे.
शहरातील अनेक रस्त्यांची विल्हेवाट लागली आहे. जनतेला या रस्त्यांवरून जाताना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांच्या अवस्थेबद्दल कोण, कोणाला जाब विचारणार? अशा प्रकारची कारवाई करून जनतेकडून दंड आकारला जात आहे. लॉकडाऊन नंतर जनतेला अन्नपाण्याची काळजी लागली आहे. अशातच हा कारवाईचा बडगा उगारणे योग्य नसल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
रहदारी पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केली आहे. परंतु त्यांच्या या कारवाईमुळे जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून प्रत्येक ठिकाणी होत असलेल्या या कारवाईबद्दल जनता नाराजी व्यक्त करत आहे.