शहर आणि परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. आता चोरट्यांनी ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळवला असून मंदिरे ही सुरक्षित राहिली नाहीत. त्यामुळे मागील पंधरा दिवसात तालुक्यात 5 मंदिरे फोडण्यात आली आहेत. विशेषकरून लक्ष्मी मंदिरांना लक्ष्य बनविण्यात येत आहे.
त्यामुळे पोलिस सुस्त झाले असून चोरट्यांचा बंदोबस्त करणार तरी कोण? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. बेळगाव येथील कलखांब येथे महालक्ष्मी मंदिरात चोरीचा प्रकार घडला आहे. रविवारी ही घटना उघडकीस आली असून चोरट्यांनी सुमारे पंचवीस हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लांबविले आहेत.
या घटनेची नोंद मारिहाळ पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. या आधीही बेळगाव तालुक्यातील अनेक गावातील लक्ष्मी मंदिरांमध्ये चोरी झाली आहे. कलखांब येथील मंदिरात चोरट्यांनी प्रवेश करून देवीच्या अंगावरील चार ग्रॅम चे मंगळसूत्र चार ग्रॅमची कर्णफुले व 200 ग्रॅम चांदीचे दागिने पळविले आहेत. दानपेटी मधील पंधराशे रुपये ही चोरट्यांनी लांबविली आहेत.
मारीहाळ पोलीस स्थानकात यासंबंधी सुधीर रामा सुतार यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. मात्र चोरटे सुसाट असून पोलिस सुस्त झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत पाच ते सहा मंदिरे फोडण्यात आली असली तरी एकाही चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले नाही. त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या पंधरवड्यात पाच ते सहा मंदिरे फोडण्यात आली असली तरी पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा तातडीने चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामीण भागातून जोर धरू लागली आहे.