Monday, December 30, 2024

/

निगेटिव्हिटी वर करा मात-

 belgaum

कोरोनाच्या धास्तीमुळे आज प्रत्येकजण खबरदारीच्या उपाययोजनांमध्ये गुंतला आहे. त्यातील एक भाग म्हणजे वारंवार हात धुणे. दिवसातील बराच वेळ प्रत्येकजण या उपाययोजनेमध्ये गुंतलेला दिसून येतो. सातत्याने सॅनिटायझर आणि साबणाने हात धुणे ही गोष्ट नागरिकांच्या अंगवळणी पडली आहे. परंतु कोरोना सारखा आजार येण्याआधी कोणीही या पद्धतीने स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहत होते, असे अजिबात वाटत नाही.

इतिहासाची पुनरावृत्ती होते ही गोष्ट जगजाहीर आहे. आणि त्याचाच प्रत्यय आज अनेकवेळा येत आहे. १९१९ मध्ये “स्पॅनिश फ्लू” मुळे जगभरात जवळपास १०० दशलक्ष लोक मरण पावले होते, या दरम्यान हात धुण्याचा संदेश जगभर देण्यात आला होता. “स्पॅनिश फ्लू” मुळे त्यावेळीही आजच्यासारखीच परिस्थिती उद्भवली होती. अनेकांना उपचारासाठी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते.

२००९ मध्येही H1N1 आणि त्यानंतर २०१६ मध्ये इबोलासारख्या साथींच्या रोगांचा सामना करावा लागला. त्यावेळेसही मानवाला एक संदेश देण्यात आला. परंतु नेहमीप्रमाणेच मानवाने याकडे दुर्लक्ष केले. परंतु कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने भल्याभल्याना वाकायला लावले आहे. मानव नेहमि पुढच्याला ठेच आणि मागच्याला शहाणपण अशाच पद्धतीने वागत आला आहे. पूर्वजांनी अनेक चालीरीती आणि अनेक गोष्टी या काही विशेष दृष्टिकोन ठेऊनच सुरु केल्या असाव्यात. परंतु नव्या पिढीने बदलाच्या नावाखाली अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केले. आपल्या पूर्वजांनी, विद्वानांनी, व गुरूंनी अशा बऱ्याच गोष्टींचा अनुभव घेतला. त्यावर आधारीत संदेश पुढील पिढीला देण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला आणि त्या गोष्टींचे अनुकरण करण्याचा आग्रह केला. अनेकांनी या गोष्टींचा लाभ घेतला. परंतु अनेकांनी परिवर्तनाच्या नावाखाली स्वतःला त्रासात टाकले. या परिस्थितीत आपली मानसिकता उंचावण्यासाठी खाली काही तत्त्वे सुचविली आहेत.

“Tought Times Never Last, But Tough People Do – Dr. Robert Schuller” – जेव्हा आपण आपली स्वप्ने साध्य करण्याच्या विचारात असता, आपल्या प्रियजनांच्या सहवासात असतो तेव्हा आनंदी असतो. आपण त्या क्षणांचा आनंद घेतो; आम्ही उत्साही, सकारात्मक असतो, आणि काहीही झाले तरी विश्वास गमावत नाही. आपण खूप मोठे बनू याकडेच लक्ष असते. दुसऱ्यावर टीका, अपयश, चिंताग्रस्तपणा, वेदना, व्यावसायिक समस्या, नात्यातील समस्या असे विचार सहसा खरे नसतात, परंतु आपण सतत त्या विचारांनी घेरलो असल्यामुळे आपणाला ते विचार वास्तवात आहेत असे वाटते, आणि अशा विचारांमुळेच आपण निराशेकडे वाटचाल करतो. या गोष्टीला Mood Swings म्हणतात. जिथे एक आनंदी व्यक्ती पटकन आपल्या भावना बदलते, लगेच दु:खी होते, काहीतरी चूक करते आणि नंतर त्या वागण्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते.

Tejas kolekar
Tejas kolekar teacher

आपण सर्व विचारांसाठी खुले असले पाहिजे, परंतु सतत नकारात्मक विचारसरणीत राहिल्यास आपली उर्जा निघून जाते आणि इच्छाशक्ती दुर्बल होते, आणि स्वत:ला पुन्हा उभं करण्यासाठी खूप वेळ लागतो आणि ते कठीणही वाटते. यामुळे असुरक्षितता जाणवू लागते आणि मानसिकता हळू हळू नकारात्मकतेकडे वळते.

ही संकल्पना समजून घ्या

आपल्याला समस्या आहेत का? हो. आपल्याला नेहमीच काही समस्या असतील का? हो. आपल्या समस्या आपण व्यवस्थापित करण्यायोग्य आहोत का? हो. जिवंत असलेल्या प्रत्येक व्यक्तीस समस्या उद्भवू शकतात. परंतु जर आपण आपल्या जीवनात खाली दिलेल्या तत्वांना अमलात आणले तर समस्या चांगल्या प्रकारे हाताळल्या जाऊ शकतात.

आपल्या विचारांचे वर्गीकरण करा – आपल्याला एका दिवसात हजारो विचार येतात, परंतु त्यांचे सकारात्मक आणि नकारात्मकतेमध्ये वर्गीकरण करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा ९७% विचार खरे नसतात, ते निरुपयोगी आणि नकारात्मकही असू शकतात. म्हणून आपण काय विचार करीत आहोत, याची काळजी घेतली पाहिजे.

“तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही” किंवा “हे तुम्हाला जमणारे काम नाही” नेहमी असे ऐकूनच आपण मोठे झालो आहोत. हे विचार कधीही स्विकारू नका, त्यांचे सकारात्मक पुर्नगठनकरा. जेव्हा आपण आपल्या विचारांशी खूप शिस्तबद्ध असतो तेव्हा हे सहसा घडते. ही एक चाकोरीबध्द विचारसरणी आहे, जिने आपली अशी रचना केली आहे कि, आपल्याला अशक्य अशा गोष्टी सांगते. जीवनात काही गोष्टी साध्य करण्यासाठी क्षमतेपेक्षा ती गोष्ट करण्याची वृत्ती आणि मानसिकता अधिक महत्त्वाची आहे. नकारात्मक मानसिकतेमुळे आपण कधीही विजय प्राप्तकरू शकत नाही.समस्या या कालांतराने दूर होतात, भविष्यात अशा अनेक संधी आपली वाट पाहत आहेत, हे लक्षात ठेवा.

आपल्या आत्मविश्वासाची शक्ती वाढवा – एकदा आरेखित झालेल्या विश्वास प्रणालीमध्ये कधीच सुधारणा होणार नाही. दृढ विश्वास प्रणाली बनविण्यासाठी, मुलांसमोर नकारात्मक किंवा नको असलेल्या गोष्टी बोलणे थांबवा. लॉकडाउन कालावधी फार महत्वाचा ठरणार आहे. कारण मुलांनी आपल्या हार्ड ड्राइव्हवरून या काळात कोणत्या गोष्टी डाउनलोड केल्या आहेत हे आपल्याला नंतर समजेल. आत्मसम्मान व आत्मविश्वास स्वाभाविकपणे विश्वास प्रणालीसह येतो. विचार करण्याची पद्धत, नैतिक मूल्ये, आणि वर्तन या गोष्टी जी मुले आत्मसात करतात, भविष्यात ती मुले खूप मोठे यश संपादित करू शकतात. ”तुमचा विश्वास बळकट करा मग विश्वास तुम्हास बळकट करेल..”

चिकाटी निर्माण करा – लॉकडाऊननंतर बऱ्याच लोकांना रोजगाराच्या समस्येचा सामना करावा लागत आहे आणि ते आर्थिक संघर्षही करीत आहेत. रोजगाराची अशी स्थिती काही नवी नाही आणि ती भूतकाळातही बऱ्याच लोकांनी अनुभवली आहे.

शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरंतर प्रयत्न करून या परिस्थितीवर विजय मिळविता येते. जे लोक काही प्रयत्न न करता घरीच राहिले त्यांनी प्रयत्नशील लोकांपेक्षा जास्त नुकसान सोसले आहे. असहाय्य किंवा निराश वाटणे ही सामान्य लक्षणे आहेत. एक गोष्ट नमूद केली पाहिजे की, “जेव्हा जेव्हा बेरोजगारीचा दर वाढलाय तेव्हा स्वयंरोजगाराचे प्रमाणही वाढले आहेत,” परंतु हा अनुभव केवळ मार्ग शोधणाऱ्यांच्या बाबतीत येतो, समस्या सोडवणाऱ्या लोकांबाबत नाही. ज्या लोकांना हे समजले की काहीच न केल्यापेक्षा काहीतरी करणे योग्य आहे ते लोक अशा परिस्तिथीतून चांगले बाहेर आलेत. बऱ्याच लोकांनी नवीन गोष्टी, नवे व्यापार सुरु केले आहे, हे एक सकारात्मक चिन्ह आहे आणि त्यांच्या चिकाटीमुळे, ते नक्की यशस्वी होतील. आपण नेहमी आश्चर्य व्यक्त करतो कि कसे लोक मोठे व महान बनतात, परंतु हे सर्व सामान्य लोक असामान्य असा निर्धार करतात. “जगात चिकाटीचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही. ना शिक्षण, ना प्रतिभा, ना ज्ञान. प्रतिभावान अयशस्वी माणूस हेच सर्वसामान्यतः दृष्टीस येते.

आपली भावनात्मक गुणवत्ता वाढवा – आज प्रत्येकाला भावनिक बुद्धिमत्तेबद्दल माहिती आहे, परंतु खूप कमी लोक या गोष्टीसाठी सक्षम असतात. जे लोक भावनिकदृष्ट्या बळकट असतात, ते कोणतीही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळू शकतात. तर त्याविरोधात भावनिकरीत्या दुर्बल लोक स्वतःच्या नाशाला कारणीभूत असतात. यामुळे आपल्या भावना चांगल्या प्रकारे जाणून घ्या, त्यानंतर इतर लोकांच्या भावना समजून घ्या. कोणीही निराश असेल तर त्यांना प्रेरणा द्या. सहानुभूतीसाठी धावू नका. सद्भावनेने इतरांच्या भावनांची कदर करा. इतरांशी चांगले संबंध प्रस्थापित करा. प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या असतात. त्या परिस्थितीनुसार आणि समोरच्या व्यक्तीनुसार बदलत असतात. अनेक भावना या क्षणिक असतात. त्यामुळे भावनांच्या आधारे वहात न जाता एकाग्रतेने, विचारपूर्वक निर्णय घ्यावे. लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत, असे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे मत आहे.

आपल्याकडे आधीपासूनच कल्पना आहेत – एक कल्पना ही एक संधी आहे. आपल्याला या लॉकडाउनसारख्या परिस्थितीचा पुन्हा सामना करावा लागणार नाही, म्हणून आपल्याकडे असलेल्या संभाव्यतेची साक्ष देण्याची ही वेळ आहे ज्याकडे नेहमी दुर्लक्ष केले गेले आहे. प्रत्येक माणसामध्ये शक्यता दडल्या आहेत, सर्जनशीलता आहे आणि एकाधिक प्रतिभेसह ते अद्वितीय आहेत. आमच्या कल्पनांचा शोध घेण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. संशोधन म्हणते, जेव्हा दबाव असतो तेव्हा मानव उत्तम कामगिरी करतो. जेव्हा जीवन कठीण होते, तेव्हा स्वत:ला स्मरण करून द्या, “हिरे दबावात तयार होतात..” कल्पना आल्या की ते लिहीत रहा आणि गोष्टी आपोआप कशा प्रकारे जुळून येतील हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

ध्यानाचा सराव करत राहा – शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या बळकट होणे आज पुरेसे नाही. आपण मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या पण बळकट असले पाहिजे ज्यामुळे आपल्या परिस्थितीला संवेदनशीलतेने हाताळण्याची आणि जीवनास योग्य दिशेने नेण्याची क्षमता मिळते. कारण संकट आले कि आपल्या अवतीभोवती नेहमी लोक असतीलच असे नाही. ध्यान आपल्याला आंतरिक दिशेला पाहण्यास आणि आपल्याद्वारे व्यक्त होऊ शकणाऱ्या संभाव्यताना समजून घेण्यास मदत करते. ध्यान हे आपणास भौतिकवादी गरजांच्या बाबतीत अधिक धैर्य निर्माण करण्यास मदत करते. आज सर्वात महत्वाच्या गोष्टी म्हणजे अत्यावश्यक वस्तू आणि दृढ मानसिक वृत्तीने दैनंदिन जीवन जगणे. ध्यान तणाव कमी करते आणि आपल्याला जीवनाबद्दल अधिक स्पष्टता देते. ध्यान करताना आपणास आपल्यातील उर्जा जाणवते. ध्यान आपल्याला मानसिकदृष्ट्या बळकट करते. “जेव्हा आपण सर्व शक्यता संपविल्या आहेत असे वाटेल, तेव्हा हे लक्षात ठेवा – अजून खूप आहे जगण्याजोगे…”

प्रेरणा आणि सवय – प्रेरणा घेणे स्वाभाविक आहे, परंतु प्रत्येकजण आपल्याला हवे ते आयुष्यात साध्य करत नाही. कारण ज्याने आम्हाला प्रेरित केले त्या विचारांवर कार्य करण्यास अपयशी ठरतो. एक सोपी संकल्पना आहे, जर आपण कृतीच केली नाही तर आपल्या अपेक्षेनुसार गोष्टी कशा पुढे जाऊ शकतील? प्रत्येक व्यक्ती आपले ध्येय गाठू इच्छितो, परंतु त्यानुसार कार्य करत नाही. काही काळ प्रयत्न करतात आणि मग सहजपणे थकतात. आपल्या समस्या जास्त विचारात न घेता त्यातून मार्ग काढण्याची सवय लावणे ही सर्वात चांगली पद्धत आहे. आपण चटकन आपल्या जीवनावर अन्यायकारक असल्याचा दोषाशेप करतो, परंतु हवे ते मिळविण्यासाठी आपण १००% प्रयत्न दिले आहेत की नाही हे खरोखर तपासण्याची गरज आहे. चला आतापासून एक छोटासा फरक करू – जेव्हा आपण प्रवृत्त होतो आणि स्वप्ने बघतो तेव्हा त्या बाजूला असलेल्या संक्षिप्त कृती योजनेचा उल्लेख करू आणि त्यास सवय बनविण्यास सुरवात करू. “प्रेरणेने तुम्ही आरंभ कराल आणि सवयीने वाटचाल कराल..”

मी प्रामाणिकपणे प्रार्थना करतो आणि असा विश्वास ठेवतो की, आपण सर्वजण या महामारीतून यशस्वीरीत्या बाहेर पडणार आहोत. बरेच महत्त्वाचे धडे आणि सकारात्मक मानसिकतेचे महत्त्व आपल्या उर्वरित आयुष्यासाठी का महत्वाचे आहे? हे या काळात प्रत्येकाला नक्की समजले असेल.

तेजस कोळेकर, संस्थापक : संस्कृती एज्युकेअर
समुपदेशक, शिक्षक

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.