शिक्षक हे समाजासाठी आदर्शवत आहेत, असे मत आमदार अनिल बेनके यांनी व्यक्त केले. जिल्हा पंचायत, सार्वजनिक शिक्षण विभाग आणि विभागीय शिक्षण अधिकारी, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक दिन कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते. शहरातील सेंट अँथनी शाळेच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कोविड-१९ च्या काळात शिक्षकांनी पार पाडलेली कर्तव्य हि कधीच विसरता येत नाहीत. कोविड मुळे आज शिक्षक दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जात नाही. तसेच शिक्षक हे केवळ शाळेपुरते मर्यादित नसून समाजासाठी त्यांनी केलेली कामे ही आदर्शवत असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे म्हणाल्या कि, शिक्षक हे प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक असून आपल्या देशाचे भवितव्य हे शिक्षकांवरच अवलंबून असते. शिक्षक पिढीला घडविण्याचे कार्य करतात. आणि त्यामुळेच देशात अनेक स्तरावर विद्यार्थी आघाडीवर पोहोचतात. तसेच हा शिक्षक दिन ज्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जातो, त्या सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आदर्शही समाजाने घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षकांचा आणि काही विशेष शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांच्यासह शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
34 पैकी 6 मराठी माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या शिक्षकांना हे आदर्श पुरस्कार वितरण केले शिक्षण खात्याने जाहीर केलेल्या पुरस्कारात खानापूर येथील मराठा मंडळ ताराराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक विलास बी देसाई,अनगोळ येथील मराठी शाळेच्या सह शिक्षिका जयश्री मनोहर पाटील,बसुरते शाळेच्या शिक्षिका रेखा रेणके खानापूर येथील उच्च प्रायमरी शिक्षिका आर बी बाँदीवडेकर, भालके के एच येथील शिक्षक सूर्याजी पाटील व नंदगड कन्या हायस्कूलचे शिक्षक सूर्याजी पाटील यांचा समावेश आहे.