शेतकरी जगला तर देश जगेल, आणि शेतकरी समृद्ध झाला तरच देशाची समृद्धी होईल, यासाठी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न, समस्या आणि त्यांच्या हितासाठी दिल्ली दरबारी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन कर्नाटक राज्य सरकारचे केंद्रीय विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी दिले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर बेळगावमध्ये दाखल झालेल्या शंकरगौडा पाटील यांनी आज भाजप किसान मोर्चाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले कि, भाजप सरकार हे शेतकऱ्यांचे हित नेहमीच जोपासत आले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरापा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या असून शेतकऱ्यांना सुलभरितीने कर्जपुरवठा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ होण्यासाठीदेखील सरकारने योजना कार्यान्वित केल्या आहेत. भाजप किसान मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळत असताना शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी बळ्ळारी, हलगा-मच्छे बायपास आणि इतरत्र होत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याच्या विषयावर ते म्हणाले कि, शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची संपूर्ण खबरदारी घेऊन त्यानंतर कोणतेही “प्रोजेक्ट प्लॅन” बनविण्यात येईल. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला देण्यासाठी मी सरकार दरबारी प्रयत्न करेन. सध्याच्या बाजारभावाप्रमाणेच जमिनी खरेदी करण्यात येतील, यासंदर्भात ठरावही पास करण्यात आला आहे.
तसेच सरकार आणि शेतकरी यांच्यात योग्य चर्चा घडवून आणल्यानंतर, मान्यता मिळाल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. शिवाय या जमिनीवर जे प्रकल्प, उद्योग, राबविण्यात येतील, त्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत प्रशिक्षण देण्याची सोयही करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी शेतकरी नेते नारायण सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, कि, नारायण सावंत हे शेतकऱ्यांच्या हितासाठी लढत आहेत. स्वतःची जमीन गेल्याचे दुःख असूनही शेतकऱ्यांची साथ त्यांनी सोडली नाही. भारतीय कृषी संस्कृती टिकविण्यासाठी आणि जोपासण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील राहील, आणि यासाठी मी केंद्रीय कृषी मंत्र्यांशी चर्चा करेन अशी ग्वाही त्यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी सरकार विविध योजना आखत असून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल हा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शिवाय संपूर्ण देशात कुठेही आपला माल शेतकऱ्याला थेट विक्री करण्यासाठी मुभाही देण्यात आली आहे. भाजप सरकारने हा क्रान्तिकारी निर्णय घेतला असल्याचे मत त्यांनी “बेळगाव लाईव्ह’ला शी बोलताना व्यक्त केले.याप्रसंगी सुनील जाधव, नारायण सावंत यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.