बेळगावमध्ये कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सुवर्णसौधमध्ये अधिवेशन भरवण्याची सरकारची तयारी नसून सरकारकडे इच्छाशक्तीची कमतरता आहे, असा आरोप केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केला आहे. बेळगावमध्ये आज काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हि प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
बेळगावमध्ये अधिवेशन भरविण्यात आल्यास बेळगावच्या अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकते. कोट्यवधी रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या सुवर्णसौधमध्ये राज्यपालांचे भाषण झाले पाहिजे. वर्षातून एकदा तरी खासदारांना येथे बोलाविले पाहिजे, मंत्रिमंडळाची एखादी तरी बैठक झाली पाहिजे, यासाठी राज्यसरकारला आवाहन करीत असल्याचे त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सतीश जारकीहोळी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. पत्रकारांना उत्तर देताना ते म्हणाले कि, भाजपाचे सरकार लवकरच कोसळणार आहे. ‘मिशन २०२३’ नजरेसमोर ठेऊन काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून पक्ष बळकटीसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक नेतेमंडळी आहेत. पण सध्या मुख्यमंत्रीपदाचा विचार बाजूला ठेऊन पक्ष बळकटीसाठी आणि काँग्रेसला सत्तेवर आणण्यासाठी आपण
तयारी करत असून सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा विचार करू, असे मत त्यांनी व्यक्त केले.