मराठा आरक्षण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात नुकतीच सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला जोरदार झटका दिलाय. महाराष्ट्रात नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या या सुनावणीत पुढील आदेशापर्यंत नेमणुकांना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.
यानंतर मराठी क्रांती मोर्चा आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलने होत आहेत. सरकारचे धोरण, विरोधी पक्षाचे धोरण, सत्ताधाऱ्यांचे धोरण आणि न्यायालायीन खटला अशा अनेक पातळ्यांवर मराठा करांची मोर्चा बाबतीत चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावमध्येही कमीतकमी दहा ते बारा लाख मराठी जनतेने एकत्र येऊन क्रांती मोर्चात सहभाग दर्शविला. आणि यातून मराठी माणसाची इच्छा, प्रश्न आणि मागण्यांसाठी असलेली ताकद दर्शवून दिली. या एकंदर परिस्थितीचा विचार करून बेळगावमधील मराठी जनतेला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काय वाटते यासंदर्भातील प्रतिक्रियांसाठी बेळगावमधील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रकाश मरगाळे आणि गुणवंत पाटील यांनी अनेकांशी संवाद साधला. आणि यासंदर्भातील प्रतिक्रिया महाराष्ट्रातील नेत्यांना कळविल्या.
सीमाभागातील मराठी जनता महाराष्ट्रातील एकंदर परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे, महाराष्ट्रातून मिळणारे आदेश आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या आंदोलनाची दिशा या सर्व परिस्थितीचा अंदाज सीमाभागातील मराठी जनतेला आहे. या आंदोलनात सीमाभागाचा सहभाग कसा असेल, आणि आंदोलनाची पुढील दिशा कोणत्या स्वरूपाची असेल, यावर सर्व मराठा क्रांती मोर्चातील सभासद विचार करत आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच मराठी माणसाच्या इतर हक्कांसाठी अनेक पातळीवरून न्यायालयीन लढा सुरु आहे. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अध्यादेशाची सूचनाही मांडली आहे. त्यासोबतच याचिकाकर्त्यांनी न्यायालयाने दिलेल्या निकालावर स्थगितीसाठी अर्ज दाखल केला आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता मराठा आरक्षणाचे आंदोलन अधिक तीव्र होईल, तसेच मराठा समाजाला आरक्षण नक्की मिळेल यात शंका नाही. मराठा आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्या अनेकांना हे आरक्षण मिळू नये असे जरी वाटत असले तरी, न्यायालयीन लढा सुरूच ठेवून आणि या आंदोलनामार्फत आरक्षण मिळविलेंच जाईल, अशी आशा आजही अनेक मराठा समाजातील जनतेला वाटते. मराठा समाजातील अनेक दुर्बल घटक आहेत. आर्थिक दृष्ट्या मागासलेले आहेत. अशा जनतेचा विचार करून न्यायालय नक्कीच मराठा समाजाच्या बाजूने विचार करून निर्णय देईल, अशी आशा मराठा समाजातील जनतेला आहे.
आंदोलनाच्या पुढील वाटचालीत आरक्षणाचा मुद्दा हा कायमच ठेवला जाईल, आणि आरक्षणासाठी अजूनही तीव्र लढा देण्याची तयारी महाराष्ट्रासह सीमाभागातील मराठी जनतेची आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज मोठ्या प्रमाणात एकत्र आला असून ही मराठा समाजाच्या दृष्टीने एक सकारात्मक बाजू आहे. शिवाय महाराष्ट्रातील अनेक मराठा समाजाच्या संस्था, संघटना या आंदोलनाच्या माध्यमातून एकत्रित येत आहेत, ही निश्चितच आंदोलनासाठी जमेची बाब आहे,, अशाही प्रतिक्रिया सीमाभागातील मराठी जनता व्यक्त करीत आहे.