भारतात लोकशाही आहे. त्यामुळे देशभर कोणीही कुठेही फिरू शकतो. या अनुषंगाने बेळगावमध्ये कोणीही येऊ शकतो. त्यांना आपण रोखू शकत नाही, असे वक्तव्य पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले आहे. पिरनवाडी पुतळा प्रकरणी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले कि, पिरनवाडी पुतळा बसविण्यावरून सुरु झालेला वाद स्थानिक पातळीवर सुटला आहे. याठिकाणी कुणीही येऊ शकते. त्यांना येऊ नका म्हणणे चुकीचे ठरू शकते. कर्नाटक रक्षण वेदिका आणि काही समाजविघातक प्रकृतींकडून येथे करण्यात येत असलेल्या वादग्रस्त विधानांवरून ते बोलत होते. शिवाय बेळगाव जिल्ह्यातील जनता त्यांचे प्रश्न सोडविण्यास सक्षम असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
पिरनवाडी येथे उभारण्यात आलेल्या नामफलकाबद्दल विचारले असता ते म्हणाले, कि हा फलक उभारण्याबाबत महानगरपालिकेत कोणताही ठराव पास करण्यात आला नाही. याबाबत जिल्हा प्रशासनाने शहानिशा करून योग्य ते पाऊल उचलावे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
हि सर्व परिस्थिती पाहता जिल्हा पालकमंत्री नेमके कुणाला झुकते माप देत आहेत हे पडताळून पाहण्याची वेळ आली आहे. जिथे लोकशाहीची विधाने केली जातात, त्या लोकशाहीत केवळ अशा समाजविघातक प्रकृतीना स्थान देण्यात येते का? आणि लोकशाहीच्या मार्गाने लढा देणाऱ्यांना मात्र प्रशासकीय आणि पोलिसांच्या दबावाला नेहमीच का बळी पडावे लागते याबाबत आता स्वतः पालकमंत्र्यांनीच नागरिकांना प्रश्न पाडण्यास भाग पाडले आहे.